चार दिवस पाण्याविना संतप्त नागरिकांचा ठिय्या

उल्हासनगर: पाण्यासाठी बऱ्याच महिन्यांपासून त्रास भोगणाऱ्या उल्हासनगरातील महिलांचा आणि नागरिकांचा संताप अखेर अनावर झाला. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा जाब विचारण्यासाठी श्रीरामनगर परिसरातील महिलांनी बुधवारी थेट नेताजी चौक येथील पाणीपुरवठा कार्यालयात धडक दिली.

पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा देत महिलांनी कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडला. त्यांच्या आक्रमकतेमुळे प्रशासनाला चांगलाच धक्का बसला आणि तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र तरी देखील कमी दाबामुळे बऱ्याच परिसरात पाणी आले नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

उल्हासनगर महापालिकेच्या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे शहरातील नागरिकांना नेहमीच पाणीपुरवठ्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. सोमवारी सायंकाळी अंबरनाथ पालेगाव येथील मुख्य पाण्याच्या लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कॅम्प नंबर ४ आणि ५ मधील पाणीपुरवठा अचानक बंद झाला. प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना न मिळाल्याने नागरिक अडचणीत सापडले. मंगळवारी दुपारपर्यंत दुरुस्तीच्या कामानंतर पाणीपुरवठा सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांनी ठेवली होती. मात्र, सोमवार, मंगळवार आणि बुधवारी देखील पाणी न आल्याने महिलांनी आणि नागरिकांनी थेट आंदोलनाचा निर्णय घेतला.

बुधवारी सकाळी श्रीरामनगर परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने पाणीपुरवठा कार्यालय गाठले. “आम्हाला चार दिवसांपासून पाणी नाही, लहान मुलं, वयोवृद्ध त्रस्त आहेत. यासाठी तुम्ही जबाबदार आहात,” असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत इथून हलणार नाही,” असे ठणकावत त्यांनी पाणीपुरवठा कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. महिलांचा निर्धार आणि आवाज पाहून अधिकारी देखील बिथरले.

संतप्त महिलांच्या दबावामुळे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अश्विन राठोड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा केली. काही तांत्रिक अडचणी दूर करत अखेर श्रीरामनगर परिसरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र तरी देखील दाब कमी असल्याने बऱ्याच भागात पाणी आले नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.