कोपरीतील सुशोभीकरणावरील कोट्यवधी रुपये पाण्यात
ठाणे : पूर्व ठाण्यातील निसर्गरम्य बारा बंगला परिसरातील ॲम्फी थिएटरची दुरावस्था झाली असून सकाळचे संगीत देखिल बंद झाले आहे. एकूणच या भागाच्या सुशोभीकरणावर खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची चर्चा सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक करत आहेत.
बारा बंगला परिसरात जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, शासकीय उच्च अधिकारी, न्यायाधीश यांची निवासस्थाने आहेत. या भागाचा दीड ते दोन वर्षापूर्वी एन्जल गार्डन म्हणून विकास करण्यात आला होता. सुमारे आठशे मिटरचे जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आले होते. सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची येथे मोठी गर्दी असते. त्यांच्यासाठी ॲम्फी थिएटर तयार करण्यात आले होते. तसेच मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची सकाळ आल्हाददायक जावी यासाठी जॉगिंग ट्रॅकच्या मार्गावर सुगम संगीत ऐकण्याची सोय केली होती. परंतु मागील काही महिन्यांपासून या परिसराची दुरावस्था झाली आहे.
ॲम्फी थिएटर परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. सकाळचे सुगम संगीत बंद झाले आहे. या भागात उभारण्यात आलेल्या पऱ्यांच्या प्रतिकृती मळकट झाल्या आहेत. गटारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे मॉर्निंग वॉककरिता आलेले ठाणेकर महापालिकेला दूषणे देत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात बारा बंगला परिसर येतो. त्यांनी जॉगिंग ट्रॅककरिता आमदार निधी दिला होता. या भागातील सुशोभीकरण करण्यासाठी त्यांनी राज्य आणि महापालिकेला निधीची कमतरता पडू दिली नाही, परंतु सध्या त्या परिसराची दुरावस्था झाल्याने महापालिकेने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ठाणेकरांनी केली आहे.