आणि जागता जंव असिजे |

‘केवळ काळ लोटल्यानेच सकाळ उगवेल असे या प्रभातीचे स्वरूप नाही. जो प्रकाश आमचे डोळे दिपवतो तो आमच्या लेखी चक्क अंधारासारखा आहे. ज्या दिवशी आपण जागृत असतो तोच आपल्या दिवसाचा खरा उदय. अजून दिवस खऱ्या अर्थाने उगवायचा आहे.’ – विचारवंत ‘थोरो’.
‘जागेपण’ म्हणजे नक्की काय?’
बृहदारण्यक उपनिषदात गाढ झोपेचे सहा अर्थ सांगितले आहेत. म्हणजे थोरो सांगतात ते ‘जागेपण’ जितकं महत्त्वाचं, तितकीच ही ‘गाढ झोप’ ही मौलिक.
तुमच्यापैकी कोणी म्हणतील,’अहो, सध्याच्या परिस्थितीत आम्ही ‘जागे’च असतो. उकाड्याची झोप लागतेय कुठे?’ किंवा कोणी म्हणतील, ‘दिवसभर राबराब राबल्यावर रात्री कधी झोप लागते ते कळतच नाही. आम्हाला झोपेचा एकच अर्थ माहीत आहे. डाराडूर झोप. मग इकडची दुनिया तिकडे का होईना.’ थोडक्यात काय, तर आम्हाला जागेपणीचं आणि झोपण्याचं ‘अध्यात्म’ वगैरे सांगू नका.
मंडळी, कसं आहे ना, आपण आपल्या जगण्याच्या निर्विकार व्याख्या तयार करून ते जगणं आणखी रूक्ष कसं होईल, ह्याची जणू भक्कम व्यवस्था करून ठेवली आहे. पण जरा थांबा. हे ‘झोप आणि जागेपण’ ह्यांचं प्रकरण अतिशय मनोज्ञ – इंटरेस्टिंग – आहे. ह्या इतकुशा जागेत त्याबद्दल इतकुसंच लिहिता येईल, पण हेही नसे थोडके.
थोरो ह्यांनी माणसांमधल्या ज्या ‘जागृत’ अवस्थेची अपेक्षा व्यक्त केली आहे, ती ‘जागृती’ उपनिषदांमधल्या ‘गाढ झोपे’विषयीच्या विवेचनात सापडते, हा एक सुंदर विरोधाभास. शरीराची, मेंदूची झीज भरून काढण्यासाठी झोप हवी, हे शरीरशास्त्रातलं सत्य आपल्याला माहीत आहे. परंतु त्याव्यतिरिक्त असलेली गाढ झोपेची आवश्यकता उपनिषदातल्या दीर्घ विवेचनात सांगितली आहे.
‘आपल्या अंतर्यामी वास करणाऱ्या वासनांमधील विरोध नाहीसा करणे, ज्या वासना तृप्त करणे शक्य आहे त्या स्वप्नांमध्ये तृप्त करून घेणे, अप्रिय स्मृतींच्या जखमा बुजवणे, संस्कारांचे वर्गीकरण करून त्यांची व्यवस्था लावणे, भावनेच्या अधीन झाल्याने बिघडलेला मानसिक तोल ताळ्यावर आणणे आणि जिवाच्या उत्क्रांतीचा मार्ग मोकळा करणे, अशी अति महत्त्वाची कामे गाढ झोपेत होत असतात.’
खरंतर जागेपणातला आणि स्वप्नसृष्टीतला ‘मी’ हा गाढ झोपेत नाहीसा होतो, पण तो फक्त दृष्टीआड होतो (कथेतल्या ‘सर्वसाक्षी निवेदका’सारखा). म्हणूनच तर तो ‘मी’ सांगतो, ‘मला गाढ झोप लागली होती.’ गाढ झोपेतून जागं होताना आपण पूर्वीपेक्षा थोडं अधिक असं ज्ञानाच्या दिशेनं सरकतो. जगण्याविषयी नवं काही गवसतं. थोरोंना अपेक्षित असलेली हीच तर ‘जागृती’.
‘बुद्धपौर्णिमा’ नुकतीच ‘साजरी’ झाली. हजारो वर्षांपूर्वी सिद्धार्थ गौतमाला ‘ज्ञानप्राप्ती’ झाली आणि त्यांनी मानव जातीला ‘जागृती’चा मंत्र दिला.
मंडळी, कणभरानं तरी सध्या आहोत का आपण ‘जागे’?
‘गाढ निद्रे’त जाऊन ‘चिंतन’ करण्याचा ‘गहन’ विषय आहे.
‘आणि जागता जंव असिजे |'(ज्ञानेश्वरी)…मनुष्य जोपर्यंत जागृत आहे…
तोपर्यंत त्यानं निर्माण केलेली सृष्टी अव्याहत चालू असेल, हेच तर अंतिम सत्य.

(संदर्भ: ‘बृहदारण्यक उपनिषद्’ -अनुवादक के. वि. बेलसरे/वाॅल्डनकाठी विचारविहार -थोरो -अनुवादक दुर्गा भागवत.)

 

– डॉ. निर्मोही फडके.
लेखक/व्याख्याता.
९९२०१४६७११.