शहापूर: शहापूर तालुक्यातील बेडीसगाव येथील मूळची रहिवाशी असलेली व सध्या ठाणे येथे राहत असलेली अनन्या भालेरावने स्पोर्ट्स फॉर ऑल (एसएफए) आंतरशालेय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
हिरानंदानी फाउंडेशन स्कूलच्या अनन्याने १७ वर्षाखालील मुलींच्या पीप साईट गटात झालेल्या अटीतटीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक मिळवून बाजी मारली आहे. अनन्या सध्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची तयारी करत आहे.
अनन्याने अंतिम फेरीत ३९० गुणांचा अचूक वेध घेत आपला दबदबा राखला. ठाण्याच्या घोडबंदर स्कूलच्या विधी मनेरा हिला ३८६ गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तिला अनन्याला मागे टाकण्यात थोडक्यात अपयश आले. माहिमच्या सरस्वती हायस्कूलच्या आदिती केमभवी हिने ३८४ गुणांचा वेध घेत कांस्यपदकावर नाव कोरले.
एसएफए मुंबई सत्रात बोरिवलीच्या डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयाने सांघिक जेतेपदावर कब्जा करताना २७ सुवर्ण, ३५ रौप्य,आणि ४१ कांस्य अशी एकूण १०३ पदकांची लयलूट केली. माटुंग्याच्या डॉन बॉस्को स्कूलला उपजेतेपदावर समाधान मानावे लागले.त्यांनी १० सुवर्ण, १० रौप्य आणि १५ कांस्य अशी एकूण ३७ पदके पटकावली.
मुंबईतील गोरेगावच्या विबग्योर हायस्कूलने तिसरे स्थान पटकाविले. ही स्पर्धा मुंबईतील मुंबई कामगार भवन येथे पार पडली.