ठाण्यात फेरिवाल्याच्या हातगाडीचा धक्का लागून वृद्धाचा मृत्यू

ठाणे : महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाला पाहून पळ काढणाऱ्या फेरीवाल्याच्या हातगाडीचा धक्का लागून खाली पडून एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. परिसरातील नागरिकांनी पुढे येऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.

मनोहर महाडिक (६५) असे मृत पावलेल्या वृद्धाचे नाव आहे. ते लोकमान्यनगर येथील लाकडी पूल परिसरातील दत्त प्रसाद इमारतीत दुसऱ्या मजल्यावर पत्नीसोबत राहत होते. ते रिक्षा चालविण्याचे काम करीत होते. परंतु वयोमानामुळे त्यांनी हे काम बंद केले होते. त्यांची पत्नी उषा या काल्हेर परिसरातील एका गारमेंटमध्ये काम करतात. मनोहर हे शनिवारी दुपारी भाजी घेण्यासाठी लाकडी पुल परिसरात आले. त्यावेळी ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे वाहन त्या परिसरात आले. या वाहनांला पाहून फेरिवाले तेथून पळ काढत होते. याच दरम्यान एका फेरिवाल्याच्या हातगाडीचा धक्का लागून मनोहर हे खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

मनोहर यांना परिसरातील नागरिकांनी जवळील एका दवाखान्यात नेले आणि त्यानंतर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले. तिथे न्युरो सर्जन नसल्यामुळे त्यांना मुंबईतील जे. जे रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना, त्यांचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला, असे त्यांचे बंधू सतिश महाडिक यांनी सांगितले. असे प्रकार यापुढे घडू नयेत यासाठी पालिकेने उपाययोजना करायला हवी, असे सांगत मनोहर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नी उषा यांना पालिका प्रशासनाने नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

या संदर्भात लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो, असे सांगितले. त्यानंतर मात्र वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.