मन-शरीर तंदुरुस्तीचा ध्यास; अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास

* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पोलिसांना कानमंत्र
* राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांचे शानदार उद्घाटन

ठाणे: रोज अनेक घटना घडत आहेत, सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. त्याचा ताण पोलिसांवर आहे. पण, बदलत्या काळात या आव्हानांचा सामना करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आवश्यक आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानांची कासही पोलिसांनी धरली पाहिजे, असा कानमंत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिला.

ठाणे येथील साकेत भागातील पोलिस मैदानात ३५ वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा गुरूवारपासून सुरू झाली असून या स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरूवारी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

श्री. शिंदे पुढे म्हणाले, राज्यातील तीन हजार पोलिस स्पर्धेत उतरले असून हे खेळाडू १८ खेळांच्या प्रकारात आपले कसब पणाला लावणार आहेत. या खेळामध्ये जय-पराजय होणारच. कुणीतरी जिंकणार, कुणीतरी हारणार. परंतु जिंकणे किंवा पराभूत होणे, हे महत्वाचे नाही. माझ्या मते स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक जण हा विजेताच असतो. तुम्ही सगळे जिगरबाज असल्यामुळे तुम्ही सर्वचजण जिंकलेले आहात. तसेच महाराष्ट्राचे पोलिस खिलाडी नंबर एक आहेत, हे जगाला दाखवून द्या, असेही शिंदे म्हणाले.

रोज अनेक घटना समोर येतात. सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. त्याचा ताण पोलिसांवर आहे. पण, बदलत्या काळात या आव्हानांचा सामना करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आवश्यक आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानांची कासही पोलिसांनी धरली पाहिजे, असेही श्री.शिंदे म्हणाले.

आपण नेहमीच म्हणतो की, पुणे तिथे काय उणे आहे. परंतु आता आपल्याला ठाणे तिथे काय उणे असे म्हणावे लागेल. कारण, राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे आयोजक हे ठाणे पोलिस असून त्यांनी उत्तम नियोजन केले आहे. यासाठी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. पोलिस स्पर्धकांनी पदकावर लक्ष केंद्रित करावे. त्यांना व्यवस्थेत काहीच कमी पडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. आपण नेहमीच म्हणतो की, पुणे तिथे काय उणे आहे. परंतु आता आपल्याला ठाणे तिथे काय उणे असे म्हणावे लागेल, असे सुचक विधानही श्री.शिंदे यांनी केले.

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या डॅशिंग पोलिस अधिकारी आहेत, असे सांगत त्या सुद्धा आमची लाडकी बहिणच असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सणासुदीला पोलिस रस्त्यावर उभे राहून जनतेचे रक्षण करतात, उन, वारा, पावसाची तमा न बाळगता कर्तव्य बजावतात, रक्षण करतात. कोरोना काळातही पोलिसांनी रस्त्यावर उतरून नागरिकांचे प्राण वाचवले, असेही ते म्हणाले.

ठाणे पोलिसांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना सांगितले आहे की, पोलिस मैदानात सिंथेटीक ट्रॅक आणि उच्च दर्जाची विद्युत व्यवस्था उभारण्याचे आदेश दिले आहेत. या कामासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि या कामासाठी पैसे कमी पडणार नाहीत. या मैदानाचा वापर पोलिसांसह शहरातील गुणवंत खेळाडूंना सराव करण्यासाठी होईल, असे शिंदे म्हणाले.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, गृह राज्यमंत्री योगेश कदम, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.