कसारा रेल्वे हद्दीत तरुणावर अज्ञात लुटारुंचा सशस्त्र हल्ला

कसारा : कामावरुन घरी परतत असतांना गिरीश कैलास जगताप (२२ ) रा. बारा बंगला,कसारा या युवकास प्लेटफॉर्म क्रमांक ४ च्या पुढे तीन अज्ञात व्यक्तिनी मारहाण करून पैशाची मागणी केली; त्याने नकार देताच या गुंड प्रवृत्तीच्या त्रयी पैकी एकाने कटरसारख्या धारधार शस्त्राने गिरीशच्या हातावर वार करून तिघांनी रेल्वे पॉवर हाऊस च्या दिशेने पोबारा केला.

ही घटना बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली असून कल्याण लोहमार्ग पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे. अमेझोन (पडघा) या खासगी कंपनीत नोकरीला असणारा गिरीश हा नेहमीप्रमाणे सायंकाळी आपल्या घरी येत होता. रेल्वे स्थानकाच्या थोड़े पुढे म्हणजे इगतपुरीच्या दिशेने असलेल्या उघड्या पुलाजवळील एका सफेद रंगाच्या बॉक्सजवळ बेसावध गिरीश यांस दडुन बसलेल्या तीन जणानी घेरले व त्याच्याकड़े पैसे, मोबाईलची जबरदस्तीने मागणी करून मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्याने गिरीश भेदरुन गेला व त्याने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले, मात्र काहीच हाती न लागल्याने संतापलेल्या या तीन गुंडापैकी एकाने गिरीशच्या हातावर धारदार शस्त्राने वार केला आणि पळून गेले.

हिंदी भाषिक असलेले हे अनोळखी हल्लेखोर नेमके स्थानिक की बाहेरील या बाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे. बुधवारी घड़लेल्या या संतापजनक घटनेची तक्रार अखेर उशिरा कल्याण लोहमार्ग पोलिस स्थानकात नोंदविण्यात आली असून जगताप कुटुंबिय न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.