रूग्णवाहिका चालक ठरला माता आणि शिशुसाठी देवदूत

महिलेला प्रसूतीच्या असह्य वेदना

पालघर : पालघरमधील सोमटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालक गरोदर मातासाठी देवदूत ठरला आहे.

पालघरमधील बऱ्हाणपूर वणीपाडा येथील गरोदर माता प्रतिभा डोंगरकर या महिलेला प्रसूतीच्या असह्य वेदना होऊ लागल्या. जननी सुरक्षा कार्यक्रमांतर्गत तातडीने रुग्णवाहिका प्रतिभा डोंगरकर यांच्या घरी पोहचली. मात्र, जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गावातील मुख्य रस्ता पाण्याखाली गेला होता. मुसळधार पाऊस सुरू असताना गरोदर मातेला वेळेत उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिका चालक वसंत गुरोडा यांनी रस्त्याचा आणि पाण्याचा योग्य अंदाज घेत गावाचा संपर्क तुटण्याआधीच रुग्णवाहिका पाण्यातून बाहेर काढत गरोदर मातेला रुग्णालयात पोहचवलं. वेळेत रुग्णालयात पोहचल्याने त्या मातेचा जीव वाचला असून रुग्णवाहिका चालक वसंत गुरोडा यांच्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वैतरणा नदीला पूर आल्याने बहाडोली नदीपात्रात मुंबई – वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम करणारे १० कामगार बार्जवर अडकले होते. एनडीआरएफच्या मदतीने या १० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.