रामटेक : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारसभेसाठी रामटेकला बुधवारी आले होते. त्यानंतर आता अमित शाह यांनी नांदेडमध्ये प्रचारसभा घेतली. या प्रचार सभेत त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंची शिवसेना अर्धी झाली, शरद पवारांची राष्ट्रवादी अर्धी झाली या दोघांनी काँग्रेसलाही अर्ध करुन टाकलं असं अमित शाह म्हणाले आहेत.
आज महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती आहे. या देशात सामाजिक क्रांती आणण्यासाठी त्यांचं योगदान खूप मोठं होतं. ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाईंना मी विनम्र अभिवादन करतो.” असंही अमित शाह म्हणाले. “काँग्रेसला वाटतं की वातावरण बिघडलं आहे. मी त्यांना सांगू इच्छितो वातावरण इथलं बिघडलं आहे. देशातलं वातावरण उत्तम आहे. प्रतापराव चिखलीकर रेकॉर्डब्रेक मतांनी जिंकतील. ही निवडणूक मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची निवडणूक आहे हे विसरु नका. आपण ४०० पार जाणार आहोत हे विसरु नका” असंही अमित शाह म्हणाले.
आमच्यासमोर जे निवडणूक लढत आहेत ते राहुल गांधींच्या नेतृत्वात लढत आहेत. महाराष्ट्रात तीन पक्ष आमच्या विरोधात आहेत. एक आहे नकली शिवसेना, दुसरी आहे नकली राष्ट्रवादी आणि एक अर्धीमुर्धी काँग्रेस पार्टी. गुजरातमध्ये म्हण आहे तीन तिघाडा काम बिघाडा. उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष अर्धा राहिला, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अर्धा झाला. या दोघांनी काँग्रेसलाही अर्धे करुन टाकलं. हे अर्धवट पक्ष महाराष्ट्राचं भलं करु शकतात? तर नाही. ही अशी ऑटोरिक्षा आहेत जिला तीन चाकं तर आहेत पण गिअर बॉक्स फियाटचा आहे, इतर इंजिन मर्सिडीजची आहे. या रिक्षेची काही दिशाच नाही. निवडणूक झाली की मतभेदांनीच ही आघाडी फुटून जाईल. दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वात आम्ही सगळे लढतो आहोत. असं अमित शाह म्हणाले.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात काश्मीर प्रश्नाचा आणि महाराष्ट्र, राजस्थानचा काही संबंध नाही. तुम्हीच सांगा कलम ३७० हटायला हवं होतं की नाही? यावर उपस्थितांनी होकार दिला. त्यानंतर अमित शाह म्हणाले, एखाद्या अनौरस बाळासारखं काँग्रेसने कलम ३७० सांभाळलं. मोदींनी कलम ३७० रद्द केलं आणि काश्मीर भारताशी जोडण्याचं काम केलं. सोनिया-मनमोहन यांच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ले होत होते. मोदी पंतप्रधान झाले आणि आज पाकिस्तानची देशाकडे डोळे वर करुन पाहण्याची टाप नाही. पाकिस्तानच्या घरात घुसून मोदींनी पाकिस्तानला उत्तर दिलं. संपूर्ण जगात मोदींनी संदेश पाठवला की आमच्या देशाकडे आणि आमच्या सीमांकडे नजर उचलून पाहाल तर तसं उत्तर मिळेल. असंही अमित शाह म्हणाले.