ठाणे : मुंबई महापालिकेच्या जुन्या जलवाहिनीवरून ठाण्यातील अंबिकानगर आणि आजूबाजूच्या परिसराला अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत होता, मात्र येत्या १५ दिवसांत जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याने येथील नागरीकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे.
वाढत्या नागरिकरणामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी टंचाई भेडसावत आहे. महापालिका प्रशासनाने वाढीव पाणी मिळवले परंतु मुंबई महापालिकेकडून प्रकियेविनाच पाण्याचा पुरवठा केला जात होता. यामुळे शहरातील बाळकुम, अंबिकानगर सावरकरनगर, वर्तकनगर म्हाडा, नळपाडा आणि काजुपाडा या भागात पावसाळ्यात गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. ठाणे महापालिकेने नितीन कंपनी परिसरातील मुंबई महापालिकेच्या शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर नवीन जोडणी घेऊन ही समस्या सोडवली. मात्र अंबिकानगर भागात जुन्याच वाहिनीवरून साडेतीन दशलक्षलीटर पाणी पुरवठा होत आहे.
अंबिकानगर आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य या पाण्यामुळे धोक्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने या ठिकाणी साडेतीन दशलक्षलीटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेऊन निविदा काढल्या होत्या. 3 कोटी 60 लाख रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्राप्त झालेल्या निविदांमधून ठेकेदार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या आठ दिवसांत ठेकेदाराला कामाचा कार्यादेश दिला जाणार आहे. येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याने येथील नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई महापालिका ठाणे शहरातील सावरकरनगर, अंबिकानगर, वर्तकनगर म्हाडा, बाळकुम, काजुपाडा आणि नळपाडा या परिसरांमध्ये दररोज १६ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करते. यातील अंबिकानगर परिसरात ३ कोटी १० लाख रुपये खर्चुन साडे तीन दशलक्षलीटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.