अंबरनाथ : अंबरनाथमधील तबला वादक लहान मुलांची दुबई येथे होणाऱ्या जागतिक तबलावादन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकतीच पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय तबलावादन स्पर्धेमध्ये चिमुरड्यांनी आपली मोहोर उमटवली आहे.
येथील श्री गुरुकृपा संगीतालयाचे विद्यार्थी आरुष आयरकर, सिद्धार्थ कांबळे, तनय गवई, गौरव करवंदे, श्रेयस भोईर, आळंदी अहिर, मेघा कामत यांनी तबला गुरू सुनील शेलार यांच्या मार्गदर्शनातून पुणे येथील अखिल भारतीय सांस्कृतिक मंडळ, पुणे (युनेस्कोच्या सहकार्याने) आयोजित तबला वादन स्पर्धेत आपापल्या वयोगटात प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मुलांच्या या यशानंतर आता पुढील जागतिक स्पर्धेसाठी विजयी तबला वादक दुबई येथे १५ ऑगस्ट रोजी तबला वादन करणार आहेत. या स्पर्धेसाठी सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शेलार गुरुजी गेल्या काही महिन्यापासून मेहनत व सराव करत आहेत.स्पर्धेत विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करून विजयी होतील अशी आशा तबला शिक्षक सुनील शेलार यांनी व्यक्त केली आहे.