* अमृत टप्पा योजना दोनसाठी निधी
* चिखलोली धरणाची उंची वाढवणार
अंबरनाथ: अंबरनाथ शहराकरिता अमृत टप्पा -२ आणि चिखलोली धरणाची उंची वाढविण्यासाठी ३०० कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आज, यामुळे भविष्यातील ३० वर्षांची पाणीसमस्या संपुष्टात येणार असल्याची महिती आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली.
अंबरनाथ शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये या करिता आमदार डॉ. किणीकर यांनी शासनाकडे मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंबरनाथ येथे कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांच्या दालनात योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
अमृत टप्पा -२ अंतर्गत २५८ कोटी मंजुर झाले असून या योजनेकरिता उल्हास नदीतून पाणी उचलणार असून अंबरनाथजवळील नालंबी गांव येथील नदीवर विहीर बांधण्यात येणार आहे. त्या मार्फत जलसाठा करण्यात येणार आहे. पाणीसाठा तीन झाडी येथे पंपामार्फत आणला जाणार आहे. तीन झाडी येथे ९६ दलली क्षमतेचे जल शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. तसेच पाण्याचे शुद्धीकरण करून अंबरनाथ पूर्व ६०० मिमीच्या जलवाहिनीद्वारे पाणी जलकुंभात सोडण्यात येणार आहे. तसेच अंबरनाथ (प.) विभागात ७०० मिमीची आणि ऑर्डनन्स तसेच लगतच्या नागरिकांकरिता ५०० मिमीच्या जलवाहिनीद्वारे २४ जलकुंभात साठविण्यात येणार आहे.
अंबरनाथ शहराच्या जलवाहिनी दुरुस्ती किंवा देखभाल काम सुरू असताना ठराविक जल वाहिनीचा पाणी पुरवठा बंद करण्यात येत असून त्यामुळे शहरातील व इतर विभाग पाण्यापासून वंचित राहणार नाही. अंबरनाथ शहराची पाणी पुरवठा यंत्रणा स्वतंत्र होणार आहे. या योजनेमुळे अंबरनाथकरांची २०५६ ची लोकसंख्या लक्षात घेता पाण्याची टंचाई भासणार नाही व पण्याचा प्रश्न हा पुढील ३० वर्षाकरिता मिटणार असल्याचा दावा आमदार डॉ. किणीकर यांनी केला.
या योजनेतून जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येणार आहे तसेच १६७ किमीच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत.
चिखलोली धरणाची उंची वाढवण्यासाठी ५१ कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली आहे.
या योजनेत धरणाची उंची अडीच मीटरने वाढत असून वाढीव सहा दललि पाणीसाठा वाढत आहे.
नवरेनगर येथे जलकुंभ उभारण्यात येणार आहे. तसेच विविध ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. या योजनेमुळे सध्याच्या सहा एमएलडी पाणी साठ्यावरून १२ दलली पाणीसाठा होणार असून योजनेतून अंबरनाथ (पू.) विभागातील ५० हजार नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आमदार डॉ . किणीकर यांनी सांगितले.
यावेळी श्रीनिवास वाल्मिकी, संदीप मांजरेकर, पुरषोत्तम उगले महाराज, गणेश कोतेकर, पंढरीनाथ वारींगे, सुभाष साळुंके, रवींद्र पाटील, मालती पवार आदी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.