अंबरनाथ : गाजलेल्या हिंदी, मराठी गाण्यांचा बाज त्याला डीजेच्या साथीने सप्तसुरांची बरसात आणि सप्तरंगाच्या उधळणीत हजारो अंबरनाथकरांची पावले थिरकली.
अंबरनाथला ॲड. निखिल वाळेकर यांच्या वतीने आज सोमवार 25 मार्च रोजी यंदा प्रथमच होळी आणि रंगपंचमीनिमित्ताने युवा रंग महोत्सव या बहारदार संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अंबरनाथच्या पूर्वेकडील साई विभागातील अटल मैदानात धुलीवंदनाच्या दिवशी डीजे सिमरता चौधरी यांच्या साथीने झालेल्या संगीतमय कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘गर्जा महाराष्ट्र माझा,’ ‘खई के पान बनारसवाला’, ‘रंग बरसे भिगी चुनरिया’, ‘धूम मचा ले धूम’, ‘लाल लाल पागोटे गुलाबी शेला’ झींग झिंग झिंगाट यासारख्या गाण्यांवर तरुणाईसह आबालवृद्धांनी ठेका धरला.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष मनिषा वाळेकर, राजेंद्र वाळेकर, संजय आदक, आयोजक निखिल वाळेकर यांनी सहभागी होऊन नागरिकांचा उत्साह वाढवला. या सप्तसुरांच्या कार्यक्रमाला शहरातील राजकीय, सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. यंदा प्रथमच झालेल्या युवा रंग महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने खा. डॉ. शिंदे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.