अंबरनाथला साकारणार चार एकर जागेत अत्याधुनिक रुग्णालय; शासनाकडून नगरपालिकेला ७० कोटींचा भूखंड मोफत हस्तांतरित

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये अत्याधुनिक रुग्णालयासाठी चार एकर जागेचा सुमारे ७० कोटी रुपये किमतीचा भूखंड शासनाने मोफत नगरपालिकेला मोफत हस्तांतरित केला आहे. वैद्यकीय दृष्टीने स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

रुग्णालयासाठी अंबरनाथ नगरपालिकेला राज्य शासनाकडून डीडी स्कीममधील भूखंड देण्यात आला आहे. मौजे कानसई,अंबरनाथ येथील सिटी सर्वे नंबर ४४९०(अ) हा चार एकराचा भूखंड हॉस्पिटल या प्रयोजनासाठी अंबरनाथ नगरपरिषदेस हस्तांतरित करण्याचा शासनाने आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने अंबरनाथ शहराला लवकरच पालिकेचे सुसज्ज रुग्णालय मिळणार आहे.

उच्च दर्जाच्या वैद्यकीय उपचारासाठी आजही अंबरनाथ व परिसरातील रुग्णांना ठाणे किंवा मुंबई येथील पंचतारांकित रुग्णालयाचाच आसरा घ्यावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन अंबरनाथ येथेच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे खा. डॉ. शिंदे यांनी नियोजन सुरू केले आहे.

या नियोजनाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून मौजे कानसई,अंबरनाथ येथील सिटी सर्वे नंबर ४४९०(अ) हा चार एकराचा भूखंड हॉस्पिटल या प्रयोजनासाठी अंबरनाथ नगरपरिषदेस हस्तांतरित करण्याची मागणी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्या अनुषंगाने अखेर शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून हा भूखंड अंबरनाथ नगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आला आहे. या बद्दलचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला असून या भूखंडाचे बाजारमूल्य अंदाजे ६० ते ७० कोटी इतके असल्याचे बोलले जाते. सदर भूखंड भोगवटा मूल्यरहित व कब्जे हक्काने नगरपरिषदेस देण्याबाबत शासनाने  ठाण्याच्या जिल्हाधिकारी ठाणे यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे अंबरनाथकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

अंबरनाथ शहरात यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे. तर पालिकेच्या १०० खाटांच्या रुग्णालयाची उभारणी सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे.  आता अंबरनाथ पूर्वेत आणखी एक रुग्णालय उभारले जाणार असून त्यातून अंबरनाथकरांना उत्तम वैद्यकीय सुविधा मिळणार आहे.- खा.डॉ. श्रीकांत शिंदे

अंबरनाथ शहराच्या येत्या दहा वर्षातील विकासाचे नियोजन करत असताना धार्मिक स्थळ म्हणून अंबरनाथ शिव मंदिर परिसराचा विकास, कलाक्षेत्राला वाव देण्यासाठी सुसज्ज नाट्यगृहाची उभारणी, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अत्याधुनिक क्रीडा संकुल, शैक्षणिक विकासासाठी परिपूर्ण असे स्पर्धा परीक्षा केंद्र आणि कोरोना काळात दिसून आलेली अत्याधुनिक रुग्णालयाची गरज लक्षात घेता  शासनाने रुग्णालयासाठी दिलेली मान्यता शहराच्या विकासातील महत्वाचा टप्पा ठरणार आहे. तहसीलदार कार्यालयापासून  मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत या प्रस्तावाचा वर्षभर सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आभार मानले आहेत.