अंबरनाथ: गेल्या काही वर्षांपासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून साजरा होणाऱ्या अंबरनाथ शिवमंदिर कला महोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिर फेस्टिव्हलच्या मुख्य आकर्षण आहे.
दरवर्षी महाशिवरात्रीच्या दरम्यान अंबरनाथला शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचे दिमाखदार आयोजन केले जाते, तीन ते चार दिवस चालणाऱ्या महोत्सवात गेल्या काही वर्षात अनेक दिग्गज कलावंतांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे महोत्सवाची प्रतिष्ठा दरवर्षी वाढत गेली. यावर्षी देखील मार्च महिन्यात प्राचीन शिवमंदिराच्या परिसरात भव्य शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
आर्ट फेस्टिवलसाठी शिव मंदिर परिसरात सजावटीचे काम सुरू करण्यात आले आहे. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी राम मंदिर उभारण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. यंदाच्या शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये राम मंदिर हे सजावटीचे केंद्रस्थान ठरणार आहे. त्या अनुषंगाने कार्यक्रम स्थळे देखावा साकारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासोबतच शिवमंदिर आणि त्याच्या परिसराची रंगरंगोटी देखील सुरू करण्यात आली आहे.
आर्ट फेस्टिवल कधी होणार हे निश्चित झाले नसले तरी तो फेस्टिवल फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. महाशिवरात्रीच्या अनुषंगाने शिव मंदिर आर्ट फेस्टिवल ठेवण्याचा प्रयत्न आयोजकांमार्फत सुरू करण्यात आला आहे.