खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे प्रतिपादन
अंबरनाथ : अंबरनाथला दहा वर्षांपूर्वी रस्त्यांची दैनावस्था झाल्याने गाड्या पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले होते, आता रस्ते काँक्रीटचे झाल्याने वाहनांची संख्या वाढली आहे. सांस्कृतिक अंबरनाथ अशी पुसली गेलेली ओळख विविध कामांमुळे पुन्हा मिळाली आहे. सांस्कृतिक शहराबरोबर मंदिरांचे शहर अशी नवी बिरुदावली अंबरनाथला प्राप्त झाल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.
अंबर भरारी ग्रुपच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, कवी किरण येले आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने शहरातील साहित्यिक, लेखक, कवी, कलावंत आदी क्षेत्रातील व्यक्ती आणि खासदार डॉ.शिंदे यांच्या भेटीचा अनोखा उपक्रम अंबरनाथला आयोजित केला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रसिक सहभागी झाले होते. शहरात विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली, तरीही कलादालन, ज्येष्ठ नागरिक भवन यासारख्या वास्तूची गरज व्यक्त करण्यात आली. शहरातील रस्त्यांचे काँक्रीटिकरण, उद्यानाचे नूतनीकरण अशा कामांबरोबरच शूटिंग रेंज, क्रीडासंकुल, स्पर्धा परीक्षा केंद्र, सुसज्ज रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, तरण तलाव यासारखी काही कामे झाली. काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. अंबरनाथकरांच्या दृष्टीने महत्वाचे असलेले प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण यामुळे शहराचे नाव जागतिक पातळीवर पोहोचणार आहे. त्याच्या कामाला सुरुवात झाल्याचे खासदार डॉ.शिंदे यांनी सांगितले.
पालिकेच्या वतीने साकारलेल्या नाट्यगृहाची प्रेक्षक क्षमता वाढवली, वाचनालये निर्माण केले शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांची लयलूट अनुभवायला मिळाली, या सर्व कार्यक्रमांमुळे आणि त्याचसोबत सांस्कृतिक कार्यक्रम वाढल्याने शहरात पुन्हा सांस्कृतिक शब्दाची मोहोर उमटली आहे. पुढील काळात कलादालन, ज्येष्ठ नागरिक भवन, ठाण्याच्या धर्तीवर भव्य उद्यान यासारख्या कामांचा विचार करण्याचे आश्वासन खा, शिंदे यांनी दिले.
अंबरनाथमधील पूर्णत्वाच्या मार्गावरील नाट्यगृहाला नाट्यकर्मी बाळ कोल्हटकर यांचे नाव देण्याची आग्रही मागणी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केली.
आमदार डॉ. बालाजी किणीकर, भाजपाचे नेते गुलाबराव करंजुले-पाटील, ज्येष्ठ साहित्यिक कवी किरण येले, महेश सुभेदार, इरावती लागू, जगदीश हडप या नाट्य- चित्रपट सृष्टीतील कलावंतांसह डॉ. वसंत महाजन, देवेंद्र जैन, दत्ता घावट, डॉ. गणेश राठोड, सुभाष साळुंके, प्रवक्ते किरण सोनवणे आदी या प्रसंगी उपस्थित होते.