मुदतवाढ शुल्क माफीसाठी केली बनावट सही
अंबरनाथ : मुदतवाढ शुल्क माफीसाठी बनावट स्वाक्षऱ्या करणाऱ्या कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ येथील चिखलोली परिसरातील अलीकडेच नावारूपाला आलेल्या एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड या बांधकाम क्षेत्रातील कंपनीने प्रकल्पाचे मुदतवाढ शुल्क माफ करण्यासाठी एमआयडीसीचे उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी यांची बनावट स्वाक्षरी व कार्यालयाचा बनावट शिक्का वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पत्रामुळे कंपनीचे तब्बल सहा कोटी रुपये वाचणार होते. मात्र वेळीच फसवणुकीचा प्रकार उघड झाल्याने एम्पायर कंपनीविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहराच्या पश्चिम भागातील चिखलोली परिसरात एम्पायर इंडस्ट्रीज लि.कंपनीचा गृहप्रकल्प आणि व्यावसायिक गाळ्यांचा प्रकल्प उभारला जात आहे. मात्र एमआय़डीसी क्षेत्रामध्ये एम्पायर इंडस्ट्री या कंपनीच्या नावे वाटप करण्यात आलेला भुखंड क्रमांक २२ वरील प्रकल्पाच्या विहीत मुदतीत ४० टक्के इमारत पूर्णत्वाचा दाखला एमआयडीसीकडे सादर करण्यात आला नव्हता. त्यामुळे एमआयडीसीने भुखंडधारकास मुदतवाढीपोटी सहा कोटी ७९ लाख ६७, ६८७ रूपयांचा भरणा करण्याचे लेखी पत्र एम्पायर इंडस्ट्रीजला पाठवल्याचा उल्लेख दाखल गुन्ह्यात करण्यात आला आहे. मात्र कंपनीने विहीत मुदतीत बांधकाम केल्याचे पुरावे एमआयडीसी कार्यालयात १९ सप्टेंबर रोजी सादर केले. 3 डिसेंबर रोजी संबंधित बाब एमआयडीसीचे उप जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी सुनिल भुताळे यांच्या निदर्शास आली. त्यानंतर एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक मदन पाटील यांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कंपनीच्या सर्व आरोपींना पोलिसांकडून नोटीस पाठवत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे. तर या प्रकरणाबाबत एम्पायर समुह अनभिज्ञ असून कंपनीच्या प्रतिस्पर्धी आणि विरोधकांकडून हा प्रकार करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या प्रकरणात तपासात पोलिसांना सर्व सहकार्य करत आहोत, असे एम्पायर कंपनीचे कायदेविषयक सल्लागार मनिष सिंग यांनी सांगितले.