अवघ्या २५ दिवसांत दुर्गाडी गणेश घाटावर पर्यायी रस्ता

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील दुर्गाडी येथील गणेश घाटावर दिवसरात्र काम करून नवीन रस्ता 25 दिवसांच्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात आला आहे.

या गणेश घाटावर घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होते. यासाठी दुर्गामाता चौकातून गणेश घाटाकडे जाणारे दोन रस्ते होते. एक मार्ग प्रवेशासाठी आणि दुसरा मार्ग बाहेर येण्यासाठी वापरला जात होता. तथापि, चालू वर्षी नेव्हल म्युझियमच्या बांधकामामुळे या मार्गांपैकी एक मार्ग कायमस्वरूपी बंद करण्यात आला होता. यामुळे विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाची गरज निर्माण झाली होती.

महापालिकेने पर्यायी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला असून रिंग रोडवरील सीएनजी पेट्रोल पंपापासून दुर्गाडी गणेश घाटाकडे नवीन रस्ता तयार केला आहे. हा रस्ता 115 मीटर लांबीचा आणि 15 मीटर रुंद आहे. 2.70 मीटर उताराच्या भागात रिटेनींग वॉल बनवून माती भराव करण्यात आली आहे. पावसाळ्यात नाल्याच्या पूलाचे काम चालू ठेवण्यात आले. नाल्यावर सहा फुट व्यासाचे चार पाईप टाकून पूल बांधला आहे. रस्त्याचे काम पेव्हर ब्लॉक वापरून पूर्ण करण्यात आले आहे.

सर्व कामांसाठी महापालिकेने दोन कोटी रुपयांच्या खर्चाची मान्यता दिली आहे. महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांनी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली असून श्री गणेशोत्सवाच्या आधी हे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

तथापि, रस्त्याचे कॉक्रीटीकरण सुमारे 20 ते 25 मीटरचे कॉक्रीटचे काम अनंत चतुर्दशी झाल्यानंतर पूर्ण केले जाईल. या दरम्यान कामकाजाची गुणवत्ता आणि जलदगती यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच घाटाच्या आसपासच्या क्षेत्रात आवश्यक सुविधा, जसे की पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्थापन, आणि सुरक्षेच्या उपाययोजना सुनिश्चित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिली.