हौसेला मोल नाही, सोने खरेदी जोरात; अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधणार

ठाणे : दोन वर्षांच्या कालखंडानंतर या वर्षी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी होईल, अशी अपेक्षा एकीकडे सराफ व्यापाऱ्यांना आहे. दुसरीकडे काही महिला वाढती महागाई पाहता, सोने खरेदीबाबत हात आखडता घेणार आहेत, तर काही महिलांनी यावेळी खरेदी नको रे बाबा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त म्हणून अक्षयतृतीयेला सोने खरेदी करण्याची मोठी परंपरा आहे. या दिवशी सोने खरेदी हे शुभ मानले जाते. देशात ३ मे रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी सोने खरेदी किती होईल, याची व्यापाऱ्यांना चिंता असली, तरी दोन वर्षांच्या कालखंडानंतर सोने खरेदीसाठी ग्राहक बाहेर पडतील, अशी आशाही त्यांना आहे.

लग्नसराईचे दिवस आहेत. या खरेदीसाठी अनेकांनी या दिवसाची निवड केली आहे. लग्न सोहळ्यासाठी तरी खरेदी होईल व गुंतवणूक म्हणून खरेदीची शक्यता असल्याचे सराफ व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सोने ४९ हजारांवर-

मध्यंतरी सोन्याने उच्चांक गाठला होता. सोने ५८ हजारांवर पोहोचले होते. आता सोने ४९ हजारांवर आले आहे.

चांदी ६७ हजारांवर-

चांदी मध्यंतरी ७५ हजारांवर गेली होती, आता तिचे दर ६७ हजार आहे.

सोने वर्षभरात आठ हजारांनी वाढले-

सोन्याचे दर वर्षभरात कमी-जास्त होत होते. वर्षभरात सरासरी सोने ५४ हजारांवर गेले होते, तर सरासरी ४६ हजारांवर उतरले होते. n चांदी सरासरी ७६ हजारांपर्यंत पोहोचली होती. आता चांदीचे दर कमी आले आहेत.

यंदा अक्षय तृतीयेला सोने खरेदी होईल की नाही, याबाबत ५० – ५० टक्के शक्यता वाटत आहे. लग्नसराईसाठी खरेदी करणारे ग्राहक तर नक्कीच खरेदीसाठी येतील. गुंतवणूक म्हणून नाणी, वळं घेण्याची शक्यता आहे. महागाई वाढली, तरी साधारण खरेदी होईल, अशी आशा आहे.