बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. लवकरच तो ‘बच्चन पांडे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. मराठी प्रेक्षकांशी अक्षयचं खास नातं आहे आणि त्यामुळेच त्यानं त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झी मराठीवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावली होती.
झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे कि मराठी सोबत हिंदी कलाकार सुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात. अशातच बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांनी नुकतंच ‘चला हवा येऊ द्या’ सेटवर हजेरी लावली.
पुढील आठवड्यात प्रेक्षकांना हे विशेष भाग पाहायला मिळतील. खिलाडी अक्षय कुमार याने फक्त या मंचावर हजेरीच नाही लावली तर त्याच्या ढासू स्टाईलमध्ये क्रिती सोबत एक जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा दिला. त्यांचा हा परफॉर्मन्स इतका अफलातून होता कि टाळ्या आणि शिट्या थांबल्याच नाहीत. अक्षय आणि क्रिती त्यांचा आगामी बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले होते.
चला हवा येऊ द्या च्या मंचावर अक्षय कुमार यांचा मराठमोळा अंदाज देखील प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तसंच खिलाडी कुमार मंचावर आला आहे म्हणून विनोदवीरांनी देखील कल्ला केला आणि अक्षयने देखील या विनोदवीरांसोबत मिळून खूप धमाल केली. ही सर्व धम्माल मस्ती प्रेक्षकांना पुढच्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.