सासरे राजेश खन्ना यांना श्रद्धांजली देण्यासाठी अक्षय कुमारने साकारली विशेष भूमिका

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षयने आता पर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. कधी अक्षय आपल्याला जादूगार म्हणून दिसला तर कधी गुप्तहेर म्हणून दिसला. पण यावेळी अक्षयने बावर्ची होऊन त्याच्या सासऱ्यांना म्हणजेच बॉलिवूड सुपरस्टार राकेश खन्ना यांना ट्रिब्यूट दिला आहे. ‘बावर्ची’ हा चित्रपट १९७४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राकेश खन्ना आणि जया बच्चन यांची जोडी पाहायला मिळाली आहे.

राजेश खन्ना यांनी बावर्ची या चित्रपटात एका बावर्चीची भूमिका साकारली होती. आता अक्षयने एका तेलाच्या जाहिरातीसाठी बावर्चीची भूमिका साकारली आहे. हीच जाहिरात शेअर करत अक्षय म्हणाला, “आपल्या हीरोची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी आपल्याला खूप कमी वेळा मिळते. ही जाहिरात करताना मलाही तसाच आनंद झाला होता. मला माझ्या सासऱ्यांची आठवण आली, त्यांची नावाजलेल्या भूमिकेने मला ही भूमिका साकारायला प्रेरित केले.”

दरम्यान, ‘बावर्ची’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हृषिकेश मुखर्जी यांनी केले आहे. या चित्रपटात राकेश खन्ना आणि जया बच्चन यांच्यासोबत उषा किरण, दुर्गा खोटे, अस्रानी दिग्गज कलाकार होते. हा चित्रपट बंगाली चित्रपट Galpo Holeo Sattiचा हिंदी रिमेक होता.