पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई करणार; अजित पवार गटाचा इशारा
अकोला : अजितदादांसोबत गेलेले आमदार निधीवाटप झाल्यानंतर परत येतील, सर्वच आमदारांना पक्षबंदी नसल्याचं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केल्यानंतर आता त्यावर अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. शरद पवारांचं हे वक्तव्य केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी आहे, आमच्या आमदारांवर बारीक लक्ष असून पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
अजित पवारांसोबत गेलेल्यापैकी सर्वांनाच आपल्या पक्षात प्रवेशबंदी नसल्याचे वक्तव्य शरद पवारांनी केले. अजित पवार गटातील अनेक आमदार लवकरच आपल्यासोबत येणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले. यावर अजित पवार गटानं प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवारांचे हे वक्तव्य फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. अजित पवारांसोबतचे कुणीच शरद पवारांकडे जायला तयार नसल्याने त्यांनी आता नव्या उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचे मिटकरी म्हणाले. आमच्या आमदारांवर आमचे बारीक लक्ष असून कुणी पक्षशिस्त मोडायचा प्रयत्न केला तर पक्ष त्यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचे मिटकरी यांनी स्पष्ट केले.