आव्हाड यांचा खंदा समर्थक अभिजित पवार यांचा आरोप
ठाणे: मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात गेलेले डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक अभिजित पवार हे अवघ्या दोन दिवसांत स्वगृही परतले. “तडीपार करू, मकोका लावू, दोन वर्षे जेलमध्ये डांबून ठेऊ, ईडीची कारवाई करू अशा धमक्या नजीब मुल्ला यांनी दिल्याने आपण घाबरलो होतो. त्यामुळे मी आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहचलो होतो. त्यातूनच मला जबरदस्तीने अजित पवार यांच्यासमोर उभे केले आणि माझा पक्षप्रवेश करून घेतला, असा खळबळजनक आरोप अभिजत पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
मंगळवारी अभिजित पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. आज (गुरुवार) पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात येऊन आपली व्यथा मांडली. यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
अभिजित पवार म्हणाले की, ठाणे शहरात राजकीय ब्लॅकमेलिंग सुरू आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड हे माझे नेते आहेत. मी त्यांची साथ मरेपर्यंत सोडणार नाही. निवडणुकीच्या वेळी माझ्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. त्यावेळी मी शांतपणे कार्यालयातून निघून गेलो. तरीही माझ्यावरच ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मला सुमारे ५० दिवस बाहेर रहावे लागले होते. त्यानंतर श्री.मुल्ला हे फोन करून माझ्यावर दबाव टाकत होते. तडीपारी, मकोका याची धमकी देऊन डॉ. जितेंद्र आव्हाड यांना अडकविण्याचा प्रयत्न केला जात होता. माझ्या सहकाऱ्यांनाही दमबाजी केली जात होती. ज्यांच्यावर एकही गुन्हा नाही, अशा माझ्या मित्रांना श्री. मुल्ला यांच्या दबावामुळे पोलिसही दमबाजी करीत होते. त्या दबावातूनच मी फसलो गेलो. मी आत्महत्या करणार होतो. मात्र, डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा फोन आला आणि मी आज सर्वांच्या समोर आलो. अजित दादांना आपण विनंती करतो की ब्लॅकमेलिंग करून आमचे आयुष्य बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आवरा, असे पवार यांनी सांगितले.
दुसरा परमार घडवायचा आहे का?-आव्हाड
ब्लॅकमेलिंग करणाऱ्याने परमार नामक विकासकाचा जीव घेतला आहे. जमील शेखला गोळ्या घातल्या आहेत. आणखी एक आत्महत्या त्याला घडवायची आहे का? आमच्या पक्षाचे कळवा-मुंब्रा भागाचे अध्यक्ष शमीम खान यांना दुबईहून धमक्यांचे फोन आले होते. आणखी किती घरे बरबाद केली जाणार आहेत. अभिजित घाबरला म्हणून तिकडे गेला होता. माझ्या संपत्तीची चौकशी करायला लावणार होते. आपले आव्हान आहे कि त्यांनी बिनधास्त चौकशी करावी. पण, त्याचवेळी जमील शेख खून प्रकरणाचा तपास नितीन ठाकरे या अधिकाऱ्याकडे द्या. बघा काय काय उघडकीस येईल ते ! आपल्या राजकारणासाठी एखाद्याचा जीव घ्यायला तो निघाला आहे. सध्या कोणतेही पद नसताना एका माणसाला ठाणे महानगर पालिकेत दालन कसे काय दिले जाते? याच दालनातून तो पालिका बापाची मालमत्ता असल्यासारखी चालवत आहे. पालिकेच्या मालकीची घरे आपल्या माणसाला खिरापतीसारखी दिली जात आहेत. मुख्यमंत्री म्हणाले होते कि, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संवाद बंद झाला आहे. फडणविस असले प्रकार करीत नाहीत. पण, अजितदादांच्या हाताखालची माणसे काय करतात, हे या माध्यमातून राज्याला सांगत आहे. याबाबत आपण फडणविस यांची भेट घेणार आहोत, असे श्री.आव्हाड म्हणाले.
राबोडीत भस्मासूर जन्म घेत आहे!
जमील शेखच्या खून प्रकरणातील आरोपी एकाच ठिकाणी आहेत. ठाणे जेलमधील कॅन्टीन राबोडीतील एक माणूस चालवत आहे. तो माणूस जमील हत्याकांडातील आरोपींना मोबाईल फोन पुरवत आहे. या हत्याकांडातील एका आरोपीने सुपारी घेणाऱ्या गुंडाला जेलमध्येच मारहाण केली आहे. राबोडीतून सोने-हिरे यांची तस्करी होत आहे. एकूणच राबोडीत भस्मासूर जन्माला घातला जात आहे, याकडे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनीही लक्ष द्यावे, असे आवाहनही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.