अजिंक्य पाटीलच्या शतकाने बांधले विजयाचे तोरण

मार्शच्या आक्रमणापुढे पीडब्ल्युडीचा संघ कोसळला

ठाणे : सुवर्ण महोत्सवी ठाणेवैभव क्रिकेट करंडक स्पर्धेत शतकांचा पाऊस पडत असून मागील सामन्यांमधील तीन शतकांनंतर आज मंगळवारी आणखी एका शतकाची भर पडली. मार्श संघाच्या अजिंक्य पाटील याने नाबाद १०१ धावा करत पीडब्ल्युडी संघाला पराभवाकडे नेले. मार्श संघाने हा सामना सात गडी राखून जिंकला.

मंगळवारी सेंट्रल मैदान येथे झालेल्या दुसऱ्या फेरीतील क गटातील सामन्यात नाणेफेकीचा मान ज्येष्ठ क्रिकेटपटू व प्रशिक्षक सुशील म्हापुसकर यांना देण्यात आला. पीडब्ल्युडी संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र मार्शच्या आक्रमक गोलंदाजांपुढे पीडब्ल्युडी संघाचा पंकज पवार वगळता एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंकजने ४२ चेंडूंत चार षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या. तर रुपेश कदम २३, प्रल्हाद पाटील २८ आणि दत्तप्रसाद बाईत याने २६ धावा करत संघाला योगदान दिले. पीडब्ल्युडी संघाने ३१.५ षटकांत सर्व गडी बाद १५८ धावा केल्या. मार्श संघाकडून केतन खरात याने ४.५ षटकांत अवघ्या ११ धावा देत चार गडी बाद केले. तर शिवम जैस्वालने पाच षटकांत २८ धावांच्या बदल्यात तीन गडी बाद केले. श्रेयस केसकर, चिन्मय कदम आणि प्रणव जगताप यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

पीडब्ल्युडी संघाने दिलेले १५८ धावांचे आव्हान मार्श संघाने फक्त १३.३ षटकांत तीन गड्यांच्या बदल्यात परतवून लावले. याचे सारे श्रेय अजिंक्य पाटील या शतकवीराला जाते. त्याने अवघ्या ४० चेंडूत सहा षटकार आणि १३ चौकारांची आतषबाजी करत नाबाद १०१ धावांचा रतीब टाकला. तर ऋतिक भोसले याने ३१ धावा करत अजिंक्य पाटीलला साथ दिली. पीडब्ल्युडी संघाच्या सुरज मिश्रा याने तीन गडी मिळवले पण त्याची ही लढत एकाकी ठरली.