मीरा-भाईंदर ते वसई-विरार २५ किमीचा टप्पा
मुंबई : ‘दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९’ मार्गिकेचा विस्तार मीरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो १३ मार्गिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे. ही मार्गिका आतापर्यंत कागदावरच होती, पण आता मात्र मेट्रो १३ मार्गिका मार्गी लावण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
मेट्रो १३ मार्गिकेच्या सुधारित संरेखनास आणि सुधारित आराखड्यास नुकत्याच झालेल्या प्राधिकरणाच्या १६० व्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सुधारित संरेखनानुसार ही मार्गिका २५.०३ किमी लांबीची असणार आहे. आता या मार्गिकेचा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशासाठीच्या १४ मेट्रो मार्गिकांच्या प्रकल्पातील आता केवळ तीन ते चार मार्गिकांचीच कामे सुरू होणे बाकी आहे. त्यात मेट्रो १३ मार्गिकेचाही समावेश आहे. मुंबईला मिरा-भाईंदरशी मेट्रोने जोडणाऱ्या दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचा विस्तार मेट्रो १३ मार्गिकेद्वारे केला जात आहे. त्यानुसार मीरा-भाईंदर ते वसई-विरार अशी मेट्रो मार्गिका प्रस्तावित करण्यात आली. या मार्गिकेचा आराखडा, तसेच संरेखन २०१९-२०२० मध्ये तयार करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ही मार्गिका मार्गी लावण्यासाठी कोणतीही पाऊले अद्याप उचलण्यात आली नव्हती. आता मात्र या मार्गिकेच्या कामाला शक्य तितक्या लवकर सुरूवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. संरेखन आणि आराखडा तयार करून बरीच वर्षे झाली आहेत.
लोकसंख्येतही वाढ झाली असून वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी मेट्रो १३ मार्गिकेचे नव्याने संरेखन आणि आराखडा तयार करणे आवश्यक होते. कोणत्या भागात मेट्रोला प्रतिसाद मिळू शकतो याचा नव्याने अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे एमएमआरडीएने दिल्ली मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या (डीएमआरसी) माध्यमातून नव्याने संरेखन आणि आराखडा तयार करून घेतला. हा सुधारित आराखडा आणि संरेखन एमएमआरडीएच्या सोमवारच्या (१६ फेब्रुवारी) प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावास प्राधिकरणाने मान्यता दिल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
जुन्या संरेखनानुसार या मार्गिकेची लांबी २३ किमी होती, आता ही लांबी २५.०३ किमी झाली आहे. या मार्गिकेचा खर्च १७ हजार ७२५ कोटी रुपयांवर गेला आहे. मार्गिकेच्या सुधारित संरेखनास आणि आराखड्यास मान्यता मिळाल्याने आता प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येईल.
मुंबईहून मिरा-भाईंदर, वसई-विरारला अतिजलद पोहचणे भविष्यात शक्य होणार आहे. मेट्रो २, मेट्रो २ ब मार्गिकेचा विस्तार मेट्रो ९ मार्गिकेच्या माध्यमातून केला जात आहे. तर मेट्रो ९ मार्गिकेची विस्तारीत मार्गिका मेट्रो १३ मार्गिका आहे. त्यामुळे या सर्व मेट्रो मार्गिका सेवेत दाखल झाल्यास मंडाले, मानखुर्द ते वसई-विरार असा मेट्रो प्रवास करता येणार आहे.