ठाणे : मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वारकरी भवन उभारण्याची घोषणा केली असतानाच या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार नजीब मुल्ला यांनी आगरी-कोळी भवनाचे गिफ्ट मतदारांना देणार असल्याचे जाहीर करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
महायुतीचे राज्यातील उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी तातडीने मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी नियोजन विभागामार्फत ४० कोटींचा विकास निधी मंजूर केला असल्याची माहिती ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे आणि ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी मुंब्रा-कळवा भागाचा नागरी विकास करण्यासाठी हा निधी दिला आहे तसेच अल्पसंख्याक विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील पाच कोटींचा निधी दिला आहे. यापूर्वी स्थानिक खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी ५५ कोटींचा विकास निधी दिलेला आहे. नजीब मुल्ला यांच्या प्रयत्नाने नियोजन विभागामार्फत २१ जून २०२४ रोजी ५० कोटीचा निधी आला होता तर अल्पसंख्यांक विभागामार्फत ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाच कोटींचा निधी, या भागातील रस्ते जलमय होतात, त्यातून सुटका व्हावी यासाठी ३१ कोटी आणि आता नियोजन विभागामार्फत १४ ऑक्टोबर रोजी ४० कोटी असा एकूण १८१ कोटींचा विकास निधी मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी महायुती सरकारकडून देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली.
कळवा-मुंब्रा मतदारसंघ, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आगरी-कोळी भूमिपुत्र राहतात. त्यांच्याकरिता कळवा येथे आगरी कोळी भवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ४० कोटी निधीमधील पाच कोटींचा निधी पहिल्या टप्प्यात वापरला जाणार असल्याचे श्री. मुल्ला यांनी सांगितले. या मतदार संघातील शाळांची डागडुजी करण्याबरोबर गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी देखील महायुती सरकारने निधी दिला असल्याचे श्री. मुल्ला म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी आ.आव्हाड यांनी कळवा येथिल खारभूमी कार्यालयाजवळ वारकरी भवन उभारणार असल्याचे जाहीर केले होते. त्याला श्री.मुल्ला यांनी आगरी कोळी भवनाने प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे. एकूणच या मतदारसंघात गुरू-शिष्याची लढत रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे.