ठाणे : कोपरी परिसरातील धोबीघाट जलकुंभावरुन होणाऱ्या संध्याकाळच्या जलवितरणामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने दुपारचे दैनंदिन जलवितरण प्रायोगिक तत्वावर सात दिवस बंद करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातील कोपरी परिसरातील धोबीघाट जलकुंभावरून होणाऱ्या संध्याकाळच्या दैनंदिन जलवितरण व्यवस्थेत अपुरा तसेच कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याबाबत पाणी पुरवठा विभागाकडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत.
त्याबाबतची पडताळणी केली असता दुपारच्या अर्ध्या तासाच्या जल वितरणामुळे संध्याकाळच्या वितरण व्यवस्थेवर ताण पडत असल्याचे तसेच जलकुंभदेखील कमी भरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याकरिता संध्याकाळच्या वितरणामध्ये सुधारणा करणेचे दृष्टीने दुपारचे जलवितरण काही दिवस बंद करुन संध्याकाळच्या वितरण व्यवस्थेची पडताळणी करणे आवश्यक आहे. त्याबाबत अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी प्रायोगिक तत्वावर ०७ दिवस दुपारचे जलवितरण बंद करुन पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार १५ ते २१ जुलै, २०२२ या कालावधीमध्ये धोबीघाट जलकुंभावरुन होणारे दुपारचे दैनंदिन जलवितरण प्रायोगिक तत्वावर बंद करण्यात येत आहे. या जलकुंभावरून सकाळ व संध्याकाळच्या सत्रात होणारे दैनंदिन जलवितरण नेहमी प्रमाणे सुरु राहणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.