ठाणे: मागिल अनेक वर्षे लोकप्रतिनिधींना आंदण दिलेल्या महापालिका मुख्यालयातील राजकीय पक्षाच्या गटनेत्यांच्या कार्यालयांना अखेर महापालिका प्रशासनाने टाळे ठोकण्याची कारवाई केली आहे.
ठाणे महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या पक्षांकरिता महापालिका प्रशासनाने कार्यालये उपलब्ध करून दिली होती. महापालिका बरखास्त होऊन अडीच वर्षे झाली आहेत, त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी महापालिकेत नाहीत. सर्व नगरसेवक हे आता माजी नगरसेवक झाले आहेत. तरी देखिल शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपाच्या लोकप्रतिनिधींकरिता गट नेता कार्यालय वापरात होते. या कार्यालयात महापालिकेचे कर्मचारी कार्यरत होते तसेच वातानुकुलीत यंत्र, विजेचा वापर केला जात होता तसेच महापालिकेचा कर्मचारी वर्ग त्यांच्यासाठी राबत होता. या कार्यालयात बसून अनेक माजी पदाधिकारी, नगरसेवक अधिकाऱ्यांना विविध विभागाच्या फाईल आणण्यासाठी सांगून त्याच्या विरोधात पत्रप्रपंच करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आ.डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी काल करून ही कार्यालये बंद करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन महापालिका आयुक्त श्री.राव यांनी तोंडी आदेश देऊन गट नेत्यांची सर्व कार्यालये बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात आल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची गैरसोय सुरू झाली आहे.
महापालिका प्रशासनाने ही कारवाई अडीच वर्षांपूर्वी करणे अपेक्षित होते, परंतु त्यांना उशिरा का होईना जाग आल्याबद्दल ठाणेकरांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.