आमदार संजय केळकर यांची दिवाळीआधीच भेट
दीड तपानंतर २५० कुटुंबांना
मिळाली म्हाडाची हक्काची घरे
ठाणे: बाळकुम येथे २००५ साली म्हाडाने बांधलेल्या इमारतीतील घरांचा ताबा अखेर लॉटरी लागलेल्या २५० कुटुंबांना मिळाला आहे. आमदार संजय केळकर यांनी याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ऐन नवरात्रौत्सवात कुटुंबांना दिवाळी भेट दिली.
सन २००५ साली बाळकुम येथे म्हाडाने इमारत बांधली होती. या इमारतीतील घरांची लॉटरी काढण्यात आली होती. यात २५० हून अधिक कुटुंबांचे नशीब चमकले होते. मात्र प्रशासनाचा ढिसाळपणा आणि अटी पूर्ततेचा अभाव यामुळे या कुटुंबांना या हक्काच्या घरांपासून वंचित राहावे लागले होते.
इमारतीतील पार्किंग आणि अन्य अती शर्तींची पूर्तता करण्यात आली नसल्याने महापालिकेने या इमारतीस ओसी प्रदान केली नव्हती. गेली १८ वर्षे या कुटुंबांनी घरांसाठी म्हाडा, महापालिका आणि लोक प्रतिनिधींचे उंबरठे झिजवले होते, मात्र त्यात यश आले नव्हते. अखेरीस या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांनी पाच महिन्यांपूर्वी भेट घेऊन व्यथा मांडली होती. श्री.केळकर यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभेत आवाज उठवला. तसेच म्हाडा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या इमारतीस ओसी मिळाल्याने या कुटुंबांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तब्बल १८ वर्षांनी हक्काची घरे मिळणार असल्याने कुटुंबांनी आ.केळकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आमदार केळकर यांना आम्ही फार पूर्वी भेटलो असतो तर आम्हाला कधीच घरे मिळाली असती. केवळ पाच महिन्यात त्यांनी आम्हाला घरे मिळवून दिली. आमच्यासाठी ते देवासारखे धावून आले, अशा भावना रहिवाशांनी व्यक्त केल्या.
याबाबत श्री.केळकर म्हणाले, काही अटी शर्तीची पूर्तता न झाल्याने गेली १८ वर्षे ओसी मिळत नव्हती. यात अधिकाऱ्यांचा ढिसाळपणाही निष्पन्न झाला होता. अधिवेशनात आवाज उठवून म्हाडा आणि महापालिकेच्या स्तरावर पाठपुरावा करून हे काम मार्गी लागले. तब्बल दीड तपाची प्रतीक्षा संपल्याने या कुटुंबांना दिलासा मिळाला, याचे समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया श्री.केळकर यांनी दिली.