किसननगरनंतर लोकमान्यनगरचा क्लस्टर विकास होणार – मुख्यमंत्री

राष्ट्रवादीच्या हणमंत जगदाळेंसह चार माजी नगरसेवक शिंदे गटात

ठाणे : हणमंत जगदाळे यांच्या मागचे नष्टर दूर होऊन क्लस्टर प्रत्यक्ष अस्तित्वात येईल आणि किसन नगर पाठोपाठ लोकमान्य नगरचा क्लस्टर विकास केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर ट्विटरवर असणारे काही क्लास नेते असले तरी जगदाळे हे लोकांमधील मास नेते असल्याची टीकाही त्यानी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता केली.

रविवारी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह चार नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणात पुढे मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. एका पक्षात हणमंत जगदाळे यांनी  50 वर्षे काम केले. मला काही नको, केवळ लोकमान्य नगरचा विकास करा, अशी मागणी जगदाळे यांनी माझ्याकडे केली. मी मुख्यमंत्री झालो तरी आजही कार्यकर्ता आहे. सत्तेत असताना लोकांना न्याय दिला पाहिजे, म्हणून सहा महिन्यात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. आता जगदाळे यांच्यासारखा कार्यकर्ता सोबत हवा आहे. अभी तो यह झांकी है, कळवा-मुंब्रा बाकी है अशी घोषणा श्री.शिंदे यांनी करत राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष इशारा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह माजी नगरसेवक दिगंबर ठाकूर, राधाबाई जाधवर, मंगेश ठाकूर, माजी परिवहन समिती सदस्य संतोष पाटील, वनिता घोगरे, तसेच माजी स्थायी समिती सभापती दिवंगत सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण  यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. ठाण्यातील लक्ष्मी पार्क या ठिकाणी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात जगदाळे यांचे हजारो समर्थक उपस्थित होते. लोकमान्य नगरच्या विकासासाठी क्लस्टर योजना महत्वाची होती अणि मुख्यमंत्रीच क्लस्टर योजना पूर्णत्वास नेऊ शकतात असे  सांगत शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन हणमंत जगदाळे यांनी आपण आपल्या पॅनलमधील नगरसेवक आणि शेकडो समर्थकांसह आपण बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले होते.

पक्षप्रवेश झाल्यानंतर हणमंत जगदाळे यांनी अनेक मुद्दे उपवस्थित केले. 2017 च्या निवडणुकीत माझ्यावर काही आरोप झाले. आमच्याच माणसांनी ते केले. परंतु लोकांनी विश्वास ठेवून आमचे  पूर्ण पॅनल निवडून दिले. या निवडणुकीनंतर लोकमान्य नगरच्या विकासासाठी निर्णय घेणे आवश्यक होते. आपल्या आयुष्यात बरेच मुख्यमंत्री बघितले, मात्र एकनाथ शिंदे लोकांमधील मुख्यमंत्री आहेत. ठाण्यातील मुख्यमंत्री झालेत, त्यांना ताकद दिली पाहिजे. किसन नगरनंतर लोकमान्य नगरच्या क्लस्टर योजनेला गती देण्याची मागणी यावेळी जगदाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. 50 वर्षानंतर तुमच्या सोबत येतोय, स्वाभिमानी असल्याने आम्हाला सांभाळून घ्या, असे अवाहनही त्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांना केले. जर लवकर आले असते तर अजून लवकर लोकमान्य नगरचा विकास झाला असता, असे आमदार सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

स्वर्गीय रामचंद्र ठाकूर यांच्यासोबत हणमंत जगदाळे यांनी काँग्रेस पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. गेले अनेक वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राहिले. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीचे ठाण्यातील नेतृत्व त्यांना पटले नाही. हणमंत जगदाळे यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशामुळे लोकमान्य नगर परिसरात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे मुंब्र्यासोबतच ठाण्यातही राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत करण्यात शिंदे गटाला यश मिळाले आहे.