77 हजार कर्मचारी सेवेत रुजू
मुंबई: तब्बल 5 महिन्यांच्या ब्रेकनंतर आजपासून लालपरी पुन्हा एकदा सुसाट धावणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला अल्टिमेटम आज संपला असून आजपासून एसटीचे 77 हजारांहून अधिक कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत. तर उर्वरित साडेचार हजार कर्मचारी चाचण्या पूर्ण करून उद्या कामावर रूजू होणार आहेत.
गेल्या पाच महिन्यांपासून राज्याची लालपरी आणि सर्वसामान्यांच्या एसटीची चाकं ठप्प होती. एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी जवळपास दीडशे दिवस संप पुकारणारे कर्मचारी आजपासून कामावर रूजू होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून एसटी कामगारांनी संप पुकारल्यानं राज्याची जीवनवाहिनी ठप्प झाली होती. दुर्गम भागात राहणारे नागरिक, विद्यार्थी यांना या संपाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे राज्यभरातील नागरिकांना, तसेच खासकरुन ग्रामीण भागातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
एसटी बंद असल्याने अनेक नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होत होते. एसटीला पर्याय म्हणून अनेक प्रवासी वडाप किंवा इतर पर्यायी वाहनांचा वापर करत होते. यामुळे अनेक वेळा नागरिकांना जादा पैसेही मोजावेत लागत होते. आता पुन्हा एसटी पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच यामुळे विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं एसटी कामगारांना कामावर हजर होण्याची दिली होती. ही मुदत आज शुक्रवार, 22 एप्रिल रोजी संपत आहे. आज गुरुवारी 21 एप्रिल रोजी 2,992 नवीन एसटी कर्मचारी कामावर दाखल झाले आहेत. आता हजेरीपटावरील 81,683 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 4,721 कर्मचारीच उरले असून ते उद्यापर्यंत सेवेत दाखल होतील, अशी माहिती मिळत आहे.
संपामुळे तब्बल दीडशे दिवस राज्याच्या ग्रामीण भागातील जीवनवाहिनीची चाकं थांबवली होती. 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं कामगारांना आदेश दिले आहेत. सध्या दररोज सरासरी सात हजार बसेसच्या आधारे 25 हजार फेऱ्या चालवीत त्याद्वारे 17 लाख प्रवाशांची वाहतूक होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोनापूर्व काळात एसटीमधून दररोज 65 लाख प्रवाशांची वाहतूक केली जात होती, तर दिवसाला 22 कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळत होते.
दरम्यान, राज्य सरकारमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं विलीनीकरण करावं यासह महागाई भत्ता, घरभाडं भत्ता आणि पगारवाढ अशा चार प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी तब्बल पाच महिने संप पुकारला होता.