१० तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण

नवी मुंबई: मंगळवार २ एप्रिल रोजी नवी मुंबईतील खैरणे कोपरखैरणे एमआयडीसीमधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती कि बाजूच्या तीन कंपन्या जळून खाक झाल्या. ही आग डांबर गोळ्या आणि नाफता यामुळे लागली असून या आगीत कोणीही जखमी किंवा जीवितहानी झाली नाही. १० तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी बुधवारी दिवसभर कुलिंगचे काम सुरू होते. ही आग विझवण्यासाठी नवी मुंबईसह, सिडको, अंबरनाथ, तळोजा, जेएनपीटी, इंडीयन ऑईल या आजूबाजूच्या परिसरातील अग्निशमन दलाच्या वाहनांचे सहकार्य लाभले. मात्र येथील कंपन्यांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे तसेच ही आग दुहेरी तळघरात लागल्याने आग विझवताना मोठ्या अडचणी आल्या, अशी माहिती एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी संतोष पाटिल यांनी दिली. दीड वर्षांपूर्वी याच कंपनीसमोर रासायनिक कंपनीला लागलेली आग तब्बल चार दिवस धुमसत होती.

या आगीमुळे मंगळवार दिवसभर काळ्या धुराचे लोट उडत होते. धूर परिसरात पसरल्याने मंगळवारी वाशी, कोपरखैरणे, एमआयडीसी परिसरात वायू प्रदूषण दिसून आले. वायू प्रदूषणाची पातळी ही आठवडा भरातील सर्वात जास्त पातळी ठरली असून मंगळवारी हवेचा निर्देशांक १५५ ए क्यू आय नोंदवला गेला आहे. जो आरोग्यास अती खराब आहे.