वाशीतील फळ बाजारात आफ्रिकन मलावी आंबा दाखल

नवी मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आफ्रिकन मलावी हापूस आंबा वाशीतील एपीएमसी बाजारात गुरुवारी दाखल झाला आहे. बाजारात सध्या १२१५ खोके आंबा दाखल झाला असून प्रति खोका ३००० ते ५००० रुपये दर आहे.

कोकणच्या हापूस आंब्याची ओढ सर्वांनाच असते. तर कोकणातील आंब्याचा मुख्य हंगाम हा मार्च महिन्यात सुरू होतो. मागील काही वर्षापासून कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच नोव्हेंबरमध्ये परदेशी आंबे बाजारात दाखल होत आहेत. कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच या हापूस आंब्याची चव, रंग, सुगंध असल्याने खवय्यांना सुवर्णसंधी आहे.

मलावीमधील ६०० हेक्टर जमिनीवर या हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे. १३ वर्षांपूर्वी रत्नागिरीमधून ४० हजार हापूस आंब्याच्या काड्या मलावीमध्ये नेल्या होत्या. मलावीमधील हवामान कोकणातील हवामानासारखेच उष्ण दमट असल्याने तिथे लागवड केलेल्या आंब्याला फळधारणा चांगली झाली असून मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन होते.

गुरुवारी ९४५ मलावी हापूस व २७० टॉमी अटकिन्स असे १२१५ खोक्यांची (बॉक्स) पहिली खेप वाशी बाजारात दाखल झाली. त्यास ३००० ते ५००० दर आकार आणि दर्जानुसार मिळत आहे. टॉमी अटकिन्स आंब्याला ३००० दर मिळत आहे. एका खोक्यात सरासरी १० ते १४ आंबे बसत आहेत. मागील वर्षी या आंब्याला ४५०० ते ५५०० रुपये प्रति खोका किंमत मिळाली होती. त्यामुळे यंदा तुलनेने आंबे स्वस्त असून पुढील दोन-तीन महिने अफ्रिकन हापूसची एपीएमसीमध्ये आवक सुरू राहणार आहे, अशी माहिती एपीएमसी फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी दिली.