ठाणे: बेताल आणि निराधार वक्तव्याने समाजात फुटीची बीजे रोवत समाजाच्या भावना भडकाविणाऱ्या शिल्लक सेनेचे खासदार संजय राऊत यांची मानसिक स्थिती ढासळली असून, त्यांना तातडीने मनोरुग्णालयात दाखल करावे, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षकांकडे केली आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनोरुग्णालयाच्या अधीक्षकांची भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन दिले. या वेळी माजी नगरसेवक भरत चव्हाण, जयेंद्र कोळी आदी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षात संजय राऊत यांच्याकडून अनेक जबाबदार वक्तव्य करण्यात आली आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावा मागणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला लक्ष्य करणे, मराठा समाजाच्या मोर्चावर टीका करणे, गुजराती समुदायावर टीका, विधिमंडळावर टीका, गुवाहाटीला गेलेल्या आमदारांची जिवंत प्रेते आल्यानंतर शवागृहात पोस्टमार्टम करणार, राज्य सरकार बेकायदा असून त्यांचा आदेश पोलिसांनी पाळू नये, पत्रकारांच्या माईकवर थुंकणे, अत्याचार पीडित मुलीचे आक्षेपार्ह फोटो ट्विट करणे, केंद्रीय निवडणूक आयोगाला शिवीगाळ करणे आदी वक्तव्ये लक्षात घेता संजय राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळले असल्याचे स्पष्ट होत असल्याचे वाघुले यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्यावर मानसिक उपचार करण्याची गरज आहे तरी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.