उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
मुंबई : राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा तसेच अधिक पाऊस पडत असलेल्या जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, तसेच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावी पावले उचलावी, असे निर्देश त्यांनी दिले.
संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी,तसेच आवश्यकतेनुसार मदत आणि बचाव कार्य तत्परतेने पार पाडावे. पाण्याने भरलेले रस्ते, पुलांची स्थिती, विजेच्या तारा यावर विशेष लक्ष ठेवावे. मोडकळीस झालेल्या आणि धोकादायक इमारतीत संदर्भात देखील काळजी घ्यावी, मुंबई आणि ठाण्यासारख्या ठिकाणी उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू कशी राहील, किंवा जिथे मोठी अडचण येईल तिथे प्रवाशांना त्रास कसा होणार नाही यासाठी सतर्क रहावे असेही त्यांनी प्रशासनाला सांगितले.
हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, तसेच सखल भागांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी. प्रशासन तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे, मात्र नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात सध्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक जोर दिसून येत आहे.
राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले