ठाणे: मुख्यमंत्र्यांच्या गावातील रस्त्यावर पडलेले खड्डे १२ तासांच्या आत दुरुस्त करण्याचे आदेश देऊनही शहरातून जाणाऱ्या महामार्गावर खड्डेच खड्डे दिसत आहेत. यावरून आज असलेल्या खड्ड्यावरू ठामपा आयुक्त अभिजित बांगर यांनी विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला.
महापालिका आयुक्त श्री बांगर यांनी शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत महामार्गावरील घोडबंदर रोड, नाशिक, मुंबई महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत आयुक्त श्री. बांगर यांनी नाराजी व्यक्त केली. हे शहर मुख्यमंत्र्यांचे आहे. या भागातून जाणाऱ्या महामार्गावर तसेच अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडलेच नाही पाहिजेत. तरी देखिल खड्डे पडतात, परंतु हे खड्डे १२ तासांच्या आत दुरुस्त करण्याची जबाबदारी सर्वांची असतानाही रस्ते खड्डेमय असल्याने आयुक्त श्री. बांगर यांनी संताप व्यक्त केला.
शहरात मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यांना बॅरिगेटिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, परंतु तरी देखील बेरिगेटिंग करण्यात आले नाही. मेट्रोमुळे रस्त्यावर खड्डे पडत आहेत तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी यांच्या मालकीच्या रस्त्यावर खड्डे पडले असतील तर ते तातडीने बुजविण्यात यावेत, अशा सूचना पुन्हा एकदा महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या आहेत. डांबरी रस्त्यावर खड्डे पावसाळ्यात पडण्याची शक्यता असते, परंतु सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर खड्डे पडता कामा नयेत, असे देखिल आयुक्त श्री. बांगर यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
एक वर्ष होण्यापूर्वीच कोपरी पुलावरील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर खड्डा पडला होता. त्या खड्ड्यात गाड्या आदळून अपघात होण्याची शक्यता होती, परंतु तो खड्डा कालच महापालिकेने दुरुस्त केला.