ठाणे: छोट्या घंटागाड्यांची संख्या आता ५० ने वाढविण्यात येऊन तीन शिफ्टमध्ये शहरातील विविध भागात जमा होणारा कचरा उचलला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाने दिली. याशिवाय घरोघरी जाऊन कचरा वेचक महिलांचे कामही आता येत्या १५ दिवसात सुरु होणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार गुरुवारी आयुक्त शर्मा यांनी आपल्या दालनात घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली होती. या बैठकीला घनकचरा विभागाचे उपायुक्त मनीष जोशी, बालाजी हळदेकर आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी छोट्या घंटागाड्यांची संख्या वाढविण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार नव्या ५० घंटागाडय़ा घेण्याचे आयुक्तांनी प्रस्तावित केले आहे.
सध्या महापालिकेकडे ११० मोठ्या घंटागाड्या तर छोट्या ७७ घंटागाड्या आहेत. तसेच २८ कॉम्पक्टर देखील आहेत. त्यावर ४०० च्या आसपास कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. या माध्यमातून शहरातील विविध भागात जाऊन सांयकाळी चार वाजेपर्यंत कचरा उचलला जात आहे. परंतु झोपडपट्टी भागात किंवा इतर ठिकाणी दिवसभर कचरा हा टाकला जात असतो. शिवाय अरुंद रस्त्यांच्या ठिकाणी किंवा झोपडपटटी भागात शेवटच्या टोकापर्यंत घंटागाडी जात नाहीत. त्यामुळे हा कचरा इतरत्र पडलेला असतो. त्यामुळे यासाठी कचरा पेट्या देखील काही ठिकाणी उपलब्ध आहेत. परंतु आता ही संकल्पनाच बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार नव्याने घेण्यात येणाऱ्या अतिरिक्त ५० छोट्या घंटागाडी आता तीन शिफ्टमध्ये शहराच्या विविध भागात जाणार असून कचरा गोळा करण्याचे काम करणार आहे. जेणेकरुन सांयकाळी आणि रात्री रस्त्यावर पडणारा कचरा हा त्याच वेळेत उचलला जाणार आहे.दुसरीकडे मागील काही महिन्यांपासून बंद असलेला घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची संकल्पना पुन्हा एकदा सुरु केली जाणार आहे.
येत्या १५ दिवसात ही मोहीम सुरु होणार आहे. सुमारे ३५०० गट यासाठी तयार केले जाणार असून प्रत्येक ३०० कुटुंबामागे एक कामगार सज्ज ठेवला जाणार आहे.