लसूण महाग झाल्याने गृहिणींच्या चिंतेत भर

नवी मुंबई : गेल्या महिन्यापर्यंत लसणाचे दर स्थिर असल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा १५ ते २० टक्क्यांनी लसणाचे दर वाढले असून लसूण ३० ते ४० रुपयांनी महाग झाल्याने गृहिणींच्या चिंतेत भर पडली आहे. वाशी येथील एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात लसणाची आवक घटल्याने दरात पुन्हा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात केवळ १० गाड्यांमधून २८२८ गोण्या लसणाची आवक झाली. ज्यात १ ट्रक आणि ९ टेम्पोचा समावेश होता. घाऊक बाजारात उटी व्हीआयपी ड्राय लसूण १३० ते १५० रुपये प्रति किलो, देशी व्हीआयपी १२० ते १४० रुपये प्रति किलो, तर देशी सुट्टा लसूण ६० ते ९० रुपये किलोने विकला जात आहे. किरकोळ बाजारातही लसणाचे दर १४० ते २०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लसणाचे दर उच्चांकावर पोहोचले होते. किरकोळ बाजारात लसूण तब्बल ३५० ते ४०० रुपये किलोपर्यंत विकला गेला होता. परिणामी, सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणेच हॉटेल व्यवसायिकांनाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता.

मार्च महिन्यात नव्या हंगामातील लसूण बाजारात आल्याने दरात काहीशी घसरण झाली. मात्र मे महिन्यात पुन्हा एकदा बाजारात आवक मंदावल्याने आणि व्यापाऱ्यांचा कल साठवणुकीकडे वळल्याने दर वाढले आहेत.

दरवाढीचा इशारा
सध्या लसूण प्रामुख्याने मध्य प्रदेशातून येत आहे. दररोजची आवक मर्यादित असल्याने आणि व्यापाऱ्यांकडून साठवणूक सुरू असल्याने दर अजून वाढण्याची शक्यता आहे. एपीएमसीतील कांदा-बटाटा-लसूण व्यापारी मनोहर तोतलानी यांनी पुढील काळात दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे.