ठाणे: ठाण्यातील अनेक शाळांच्या परिसरात पान टपऱ्यांमधून गुटखा, ई सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांसह ड्रग्जची विक्री होत असून शालेय विद्यार्थी या पदार्थांच्या आहारी जात आहेत. या पदार्थांच्या सेवनाने त्यांच्या वागण्या-बोलण्यात अनपेक्षित बदल दिसत आहेत, त्यांच्या दप्तरातही कधी कधी नशेच्या गोळ्या आढळून येत असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी केल्या.
ड्रग्जच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती आणि ड्रग्ज विक्रीला प्रतिबंध करण्यासाठी बुधवारी ठाण्यातील महाजनवाडी येथील एका सभागृहात ठाणे शहरातील शाळा, कॉलेजचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्लासचे संचालक आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिक्षकांनी अमली पदार्थांचा व्यवसाय शैक्षणिक क्षेत्राला घातक ठरत असल्याची भीती व्यक्त केली.
पान टपरीवर मिळणारी नशेची गोळी सेवन करून विद्यार्थी शाळेत येतात. त्यावेळी ते नशेत असतात, त्यांच्या वर्तनात बदल पाहायला मिळतो, अशी तक्रार एका शिक्षकाने केली. काही मुले या गोळ्या शाळेत आणून त्या इतर मुलांना देतात. त्यामुळे मुले अमली पदार्थांच्या आहारी जात असून अभ्यासाकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. पान टपऱ्यांवर ई सिगारेटची विक्री होत असून मुलांकडेही त्या सापडत आहेत. त्यामुळे या पान टपऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षकांनी केली. शाळा-कॉलेजच्या परिसरात तस्कर फिरत असतात. एमडी ड्रग्ज, ई सिगारेट, गुटख्याच्या पुड्या, तंबाखूजन्य पदार्थ याची विक्री करत आहेत.
यावेळी व्यासपीठावर पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त डॉ.महेश पाटील, ठाणेवैभवचे संपादक तथा श्रीरंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ उपस्थित होते.
प्रत्येक पोलिस ठाण्यात शाळा आणि पोलीस ठाणे यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी एका महिला पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्या अधिकाऱ्याला याबाबत माहिती द्या. तक्रारदाराचे नाव गुप्त राखले जाईल. पोलिस नक्कीच कारवाई करतील. नशेचा हा विळखा दूर करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांनी केले.
शिक्षकांनी वर्गात आणि पालकांनी घरात मुलांची दप्तरे तपासावीत. त्यांच्या वागण्या बोलण्याचे निरीक्षण करावे. नेहमीपेक्षा त्याचे वर्तन वेगळे वाटत असेल तर त्याची कारणे तपासावीत. शाळेभोवती असलेल्या टपऱ्या, पान टपऱ्या यांच्यावर अधूनमधून पण नियमितपणे धाडी टाकून अमली पदार्थांचा शोध घ्यावा, अशा सूचना यावेळी शिक्षकांनी केल्या.
या कार्यक्रमास उपस्थित असलेले ठाणेवैभवचे संपादक मिलिन्द बल्लाळ म्हणाले, ‘पोलिस ठाण्याची पायरी शहाण्याने चढू नये असे बोलले जात असले तरी घराघरात चोर पावलांनी येऊ घातलेल्या अमली पदार्थाच्या राक्षसास रोखण्यासाठी समाजाने एकत्र यायला हवे. तरुणाईच्या हातात खुळखुळणाऱ्या पैशांमुळे ती बिथरली आहे आणि व्यसनांच्या आहारी जात आहे. आर्थिक स्वातंत्र्यामुळे ही पिढी पालकांचे ऐकेनाशी झाल्याबद्दल श्री. बल्लाळ यांनी चिंता व्यक्त केली.