पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करण्याची घाई नको

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे आवाहन

ठाणे: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तसेच एल निनो परिणाम, बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात अद्याप मौसमी पाऊस सुरू झाला नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आताच पेरणीची घाई करू नये, अन्यथा बियाणे वाया जाण्याची भिती आहे. किमान १०० मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

हवामान खात्याने वेळोवेळी दिलेल्या पूर्वसूचनेअनुसार जिल्ह्यात अद्याप मान्सूनचा पाऊस सुरू झाला नाही. लवकरच मान्सून राज्यात व जिल्ह्यात सक्रिय होण्याची शक्यता आहे. सध्या पाऊस नसल्याने पेरण्या केल्यास ते बियाणे वाया जायाची भिती आहे. तसेच भात पिक उगविण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडेपर्यंत पेरणी करण्याची घाई करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ६५९०९ हेक्टर एवढे आहे. त्यापैकी भातपिका खालील क्षेत्र ५५,००० हेक्टर एवढे आहे. त्याचप्रमाणे नाचणी व वरी पिकाखालील क्षेत्र अनुक्रमे २,४०६ हेक्टर व १,००५ हेक्टर एवढे आहे. या वर्षी राज्यात व जिल्ह्यात पावसाला पाहिजे तशी सुरूवात झाली नाही. जून महिन्याची पावसाची सरासरी ४६१.९० मि.मी. एवढी आहे. मागील दोन ते तीन दिवसात फक्त ३२ मि.मी. एवढा पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी किमान १०० मि. मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असेही जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी सांगितले.