कारवाईत तोडलेले स्लॅब जोडले; इमारतींचे आयुष्य कमी झाले!

ठामपाच्या सदोष कारवाईने दुर्घटनांना आमंत्रण

ठाणे: ठाणे महापालिका हद्दीतील कारवाई करण्यात आलेल्या शेकडो अनधिकृत इमारती पुन्हा दुरुस्त करून बांधण्यात आल्याने त्या धोकादायक ठरू लागल्या आहेत. भास्कर कॉलनीतील अमर टॉवर इमारतीची दुर्घटना घडल्यानंतर अशा इमारतींमधील शेकडो कुटुंबांनी धसका घेतला आहे.

महापालिका हद्दीतील मुंब्रा, कळवा, दिवा, वर्तकनगर, घोडबंदर या भागात मागील काही वर्षात शेकडो अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत. या इमारतींचे काम सुरू असताना महापालिका प्रशासनाने थातुरमातुर कारवाई केली होती. इमारतीच्या विरोधात कारवाई करण्यात आल्याचे दाखविण्यासाठी स्लॅब कापण्यात येत होते. महापालिका अधिकारी आणि बिल्डर यांच्यात आर्थिक सेटिंग झाल्यानंतर तोडलेला स्लॅब पुन्हा वेल्डिंग करून तयार केलेल्या फ्लॅटची विक्री करण्यात आली आहे. अशा इमारतींमध्ये शेकडो कुटुंबे राहत आहेत. ज्यावेळी फ्लॅटची विक्री केली जाते. त्यावेळी खोली सुस्थितीत दिसत असल्याने कमी किमतीत मिळणारी घरे खरेदी केली जातात, परंतु काही वर्षात त्या इमारती धोकादायक ठरू शकतात. त्यानंतर अचानक स्लॅब पडण्याच्या घटना घडतात, प्रसंगी त्या जीवघेण्या ठरू लागल्या आहेत.

महापालिका अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या आशीर्वादाने सध्या अनेक भागात अवघ्या तीन ते सहा महिन्यात आठ आठ मजल्याच्या इमारती उभ्या राहत असल्याचे चित्र ठाण्यात दिसत आहे. अशा भागात मुंब्र्यातील लक्की कम्पाऊंड दुर्घटनेची पुनरावृत्ती कधी होईल हे सांगत येत नाही, असे एका जागरूक नागरिकाने सांगितले.

महापालिका प्रशासनाने वेळीच अनधिकृत इमारतींच्या विरोधात १००टक्के कारवाई केली तर भविष्यात घडणाऱ्या दुर्घटना रोखण्यात यश येईल, असे एका माजी नगरसेवकाने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.