भारत जोडो शुक्रवारी ठाण्यात; काँग्रेसची जोरदार तयारी

ठाणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेचा समारोप मुंबईत होणार असून १५ आणि १६ मार्च रोजी ठाणे जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेची जोरदार तयारी इंडिया आघाडीने केली असून भारताचा ढाण्या वाघ ठाण्यात, अशा आशयाचे पोस्टर झळकले आहेत.

भारत जोडो न्याय यात्रेनिमित्ताने काँग्रेसचे नेते राहुल गांधीचे वादळ ठाण्यात धडकणार असून गांधी यांच्या येण्याने महाविकास आघाडीमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. या यात्रेचा मार्ग कौसा वाय जंक्शन-मुंब्रा-रेतीबंदर-खारीगाव-कळवा-टेंभी नाका-जांभळी नाका -राममारूती रोड-गोखले रोड-एलबीएस-टीपटाॅपमार्गे मुंबईत दाखल होणार असल्याचे माहिती इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषद दिली.

राहुल गांधी यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून त्यांच्यावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. कळवा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे कोर्ट नाका येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. जांभळी नाका येथे छोटेखानी सभा होणार आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार राजन विचारे, इंडिया आघाडीचे समन्वयक जितेंद्र आव्हाड ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष तसेच भारत जोडो यात्रेचे समन्वयक विक्रांत चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे आदी उपस्थित होते.