ठाण्यात माजी नगरसेविकेसह कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

ठाणे: भाजपाचा स्थापना दिन व श्री राम नवमीचा पवित्र योग साधत भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका छाया राव, मधुर राव, सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी, घोडबंदर भागातील लॉंड्री असोसिएशनचे अध्यक्ष विजय कनोजिया यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला.
भाजपाच्या ठाणे विभागीय कार्यालयात आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी प्रवेश केला होता. तर शिवसेनेच्या माजी नगरसेविका व आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील छाया राव व मधुर राव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर उथळसर येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपाचा झेंडा हाती घेतला. घोडबंदर रोड परिसरात लॉंड्री चालकांची संघटना उभारणाऱ्या विजय कनोजिया यांनी संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होईल, असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केला.