‘एनएमएमसी’च्या क्रिकेट चाचण्यांमध्ये ‘सचिन तेंडुलकर फाउंडेशन’चा सक्रीय सहभाग

मुंबई : आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील उत्तम संधी उपलब्ध करून देण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांत, ‘सचिन तेंडुलकर फाउंडेशन’ने (एसटीएफ) एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिकेच्या शाळांतील युवा क्रिकेटपटूंना ओळखून त्यांचे कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जात आहे; जेणेकरून त्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवता येईल.

ऑक्टोबर २०२२ पासून हा उपक्रम सुरू आहे. या अंतर्गत डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथील ‘एसआरटी१० ग्लोबल अकादमी’ आणि नवी मुंबई महापालिका (एनएमएमसी) यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेट चाचण्या आयोजित करण्यात येत आहेत. या चाचण्यांद्वारे उदयोन्मुख युवा खेळाडू शोधले जात असून, निवड झालेल्या मुलांना ‘एसटीएफ’च्या मार्गदर्शनाखाली मोफत प्रशिक्षण आणि क्रिकेट कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक मदत दिली जात आहे.

या उपक्रमात अधिक ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण करण्यासाठी आज क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर स्वतः चाचण्यांच्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी मुलांशी संवाद साधून त्यांना मौल्यवान मार्गदर्शन दिले. त्यामुले मुलांच्या अनुभवात भर पडली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर तेंडुलकर यांनी शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना संबोधित केले. ‘’मुलींनी आणि मुलांनी समान संधी मिळवून क्रिकेट तसेच अन्य क्रीडा प्रकारांमध्ये भाग घ्यावा, त्यामुळे खेळांमधील सर्वसमावेशकता अधिक दृढ होईल’’, असे तेंडुलकर यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमाला ‘डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी’चे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, ‘एसआरटी१० ग्लोबल अकादमी’चे जागतिक मुख्य प्रशिक्षक डॉ. अतुल गायकवाड आणि ‘एनएमएमसी’चे आयुक्त डॉ. कैलास शिंदे हे उपस्थित होते. या उपक्रमात आतापर्यंत ८१ महापालिका शाळांमधील १,०००हून अधिक विद्यार्थ्यांची क्रीडा चाचणी घेण्यात आली आहे. ‘सर्वांसाठी क्रीडा’ ही संकल्पना अधिक सुलभ व्हावी आणि सर्वांना तिचा लाभ व्हावा, या दृष्टीकोनास या उपक्रमाने आणखी बळ मिळाले आहे.