वालधुनी नदी प्रदुषित करणाऱ्यांवर कारवाई होणार

अंबरनाथ: वालधुनी नदीमध्ये रासायनिक पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पर्यावरण प्रेमींनी आंदोलनाचा इशारा देताच खडबडून जागे झालेल्या शासकीय यंत्रणांनी नदी प्रदुषित करणाऱ्या कंपन्यांवर धाड टाकून कारवाईचा निर्णय घेतल्यानंतर पर्यावरण प्रेमींनी आंदोलनाचा निर्णय तूर्त स्थगित केला आहे. पोलीस प्रशासनाने याकामी यशस्वी मध्यस्थी केली.

अंबरनाथच्या डोंगराळ भागातून उगम पावणाऱ्या वालधुनी नदीची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम नगरपालिका प्रशासनाने 14 फेब्रुवारी ते 5 जूनपर्यंत हाती घेतली आहे, या मोहिमेत सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी नागरिक, शैक्षणिक संस्था यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. काकोळे, फणशीपाडा परिसरात नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. मात्र अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यांतून नदीपात्रात सोडणारे पाणी थांबवले जात नसल्याने नदी संवर्धन कामात मोठा अडथळा ठरत आहे, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि पालिका प्रशासनाचे दुर्लक्षामुळे प्रदूषण करणार्याचा बंदोबस्त होत नसल्याचे वालधुनी जलबिरादरी, मातोश्री ट्रस्ट आदींच्या वतीने सांगण्यात आले. बस्त करण्याची मागणी पालिका प्रशासनामार्फत करूनही उपयोग झाला नाही.

अखेरीस नदी स्वच्छतेच्या कार्यात सहभागी असणाऱ्या संस्था, ग्रामस्थ आदींनी मंगळवार 17 मे रोजी उपोषण करण्याचा निर्धार केला होता. मात्र शिवाजीनगर पोलिसांनी आंदोलनाचा इशारा देणाऱ्याशी चर्चा करून एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ , नगरपालिका प्रशासन यांच्यामध्ये चर्चा करण्याचे ठरवले होते. त्यानुसार मंगळवार 17 रोजी एमआयडीसी कार्यालयात  चर्चा झाली. त्यावेळी झालेल्या चर्चेत   संयुक्त मोहिमा अचानक आयोजित केल्या जातील. त्याचप्रमाणे शहरात उभारण्यात आलेल्या चौक्यांमधून वाहनांची तपासणीही केली जाईल, असे आश्वासन बैठकीत आंदोलकांना देण्यात आले.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि स्थानिक पोलीस   संयुक्त मोहिमा घेत धाडी मारेल असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर  संबंधितांवर  कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. तर अंबरनाथ शहराच्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेल्या तपासणी चौक्या लवकरच कार्यान्वित केल्या जातील आणि त्यातून तसापणी केली जाईल अशी भूमिका पोलिसांनी मांडली. नदीत मिसळणारे नागरी सांडपाणी  थांबवण्यासाठी त्या भागात सोचखड्डे उभारणीची कामे सुरू असल्याची माहिती  नगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.

वालधुनी नदी प्रदूषणाबाबत  येत्या आठवडाभरात ठोस उपाययोजना  झाली नाही तर वालधुनी जल बिरादरी पर्यावरणप्रेमींसोबत पुन्हा आंदोलन करण्याचा  असा इशारा आंदोलकांनी दिल्याची माहिती  शशिकांत दायमा यांनी दिला.

एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सुधीर अंबुरे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे श्री. वाघ, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी सुरेश पाटील, नदी संवर्धन समितीचे शैलेश शिर्के, शशिकांत दायमा आदी बैठकीला उपस्थित होते.