होर्डिंगमालक आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा-मनसे
ठाणे: दोन महिन्यांपूर्वी घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका असो वा मुंबई महापालिकेने महाकाय होर्डिंगबाबत प्रशासनाने धडक कारवाईचा रेटा लावला. मात्र ठाणे महापालिकेने शहरातील ४९ जाहिरात फलकांवर कारवाई केल्याची माहिती दिली असून पाच जाहिरात फलक पूर्णपणे निष्कासित करण्यात आले आहेत तर परवानगीपेक्षा जास्त आकाराच्या ४४ जाहिरात फलकांचा अतिरिक्त भागाचा फक्त पत्रा काढण्यात आला आहे.
पालिकेची परवानगी नसताना अनधिकृतपणे होर्डिंग लावून अनेक वर्षे जाहिरातबाजी करून पैसा कमावणाऱ्या व्यवसायिकांवर तसेच जाहिरात विभागाच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रदेश सरचिटणीस व ओवळा-माजिवडा विधानसभा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील महत्वाचे रस्ते, चौकातील मोक्याच्या जागा पकडून तेथे लोखंडी होर्डिंग उभारले जातात. हे होर्डिंग उभारताना महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र व्यवसायिक आणि अधिकारी याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करतात, त्यामुळे अनधिकृत होर्डिंगची संख्या वाढत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचना क्र ५ नुसार जाहिरात फलक प्रदार्शित करण्यावरील निर्बंधांमध्ये पदपथावर आणि सार्वजनिक रस्त्यावर कोणताही जाहिरात फलक उभारण्यास मनाई आहे. जाहिरात फलक परवानगी घेतलेल्या भूखंडाच्या बाहय सीमा रेषेबाहेर येता कामा नये, खाडीत होर्डिंग उभारता येणार नाही यांसारख्या अटींचे पालन अजूनही होताना दिसत नाही.
घाटकोपर दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिकेने शहरात परवानगीपेक्षा जास्त आकाराच्या ४४ जाहिरात फलकांचा अतिरिक्त भागाचा फक्त पत्रा काढला आहे. जाहिरात फलक कंपनी व महापालिका अधिकारी यांच्यात भागीदारी असल्यामुळेच कठोर कारवाई न करता बघ्याची भूमिका घेतली जात आहे. गेली कित्येक वर्षे जाहिरातबाजी करून पैसे कमविणाऱ्या जाहिरात फलक मालकांना कोणताही दंड न ठोठावता महापालिका फक्त कारवाईचा दिखावा करत आहे.
महानगरपालिकेने तत्काळ सर्व ४९ जाहिरात फलक मालकांविरुद्ध तसेच जाहिरात फलक उभारणीसाठी परवानगी देताना खोटा स्थळपाहणी अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी. पुढील आठ दिवसांत कारवाई न केल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा यावेळी मनसेचे संदीप पाचंगे यांच्या वतीने देण्यात आला.