आमदार संजय केळकर यांच्या सूचनेनंतर अधिकारी लागले कामाला
ठाणे: घोडबंदरसह उर्वरित ठाण्याची पाणीटंचाई दूर होण्यासाठी अतिरिक्त ५० एमएलडी पाण्यासाठी पाठपुरावा सुरू असतानाच आमदार संजय केळकर यांनी जुन्या ठाण्याच्या टँकरमुक्तीसाठी महापलिकेत अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना केल्या. त्यानुसार कृती आराखडा तयार करण्यात आला असून अधिकाऱ्यांनी जुन्या ठाण्यातील विविध भागात भेटी देऊन उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
विस्तारत असलेल्या घोडबंदर भागासह उर्वरित ठाण्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असून संपूर्ण घोडबंदर टँकरच्या पाण्यावर तहान भागवत असल्याचे दिसत आहे. ठाण्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी ठाणे आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांबरोबर चार बैठका घेतल्या. उप मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही याबाबत चर्चा केली. त्यामुळे अतिरिक्त ५० एमएलडी पाणी ठाण्याला देण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी तातडीने २५ एमएलडी पाणी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे श्री.केळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
घोडबंदरबरोबरच जुन्या ठाण्याला पाणीटंचाई भेडसावत आहे. खारकर आळी, धोबी आळी, चरई, लोकमान्य आळी आदी भागात सुमारे दीड लाख लोकसंख्या असून दररोज या भागात टँकरने पाणी पुरवले जाते.
जुन्या ठाण्यातील पाणीटंचाई दूर करून हा भाग टँकरमुक्त करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी महापालिका मुख्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि सूचना केल्या. याबाबत कृती आराखडा तयार करण्यात आला असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधित भागात भेटी देऊन उपाययोजना सुरू केल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली.
काही भागात जलवाहिन्या तुंबल्याने तर काही ठिकाणी वाहिन्या तुटल्याने पाणीपुरवठा अपुरा होत आहे. या वाहिन्या दुरुस्त करण्याची आणि काही ठिकाणी बदलण्याची गरज आहे. त्यानुसार चरईत जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू झाले असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले.
सरसकट सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ देण्याचा लढा यशस्वी झाला आहे. न्यायालयाने आदेश दिले असले तरी परिपत्रक निघाले नव्हते. संबंधित विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर काल हे परिपत्रक काढण्यात आले. त्याची प्रत महापालिकेला दिली असून खऱ्या अर्थाने सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळणार असल्याचे श्री.केळकर म्हणाले.
सहा महिन्यांत टपाल कार्यालयांचे सक्षमीकरण
दम्माणी इस्टेट येथील पोस्ट कार्यालय असलेल्या इमारतीचा पुनर्विकास झाला आहे. टपाल कार्यालयाला जोपर्यंत येथे जागा मिळत नाही तोपर्यंत विकासकाला ओसी देण्यात येऊ नये, अशी सूचना पालिकेला केली असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. वर्तकनगर येथील टपाल कार्यालय बेसमेंटमध्ये असल्याने नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. महापालिकेने या कार्यालयासाठी सुसज्ज जागा देऊ केली आहे. वागळे इस्टेट येथे कार्यालयच नाही. बाळकुम येथील कार्यालयाचे देखील सक्षमीकरण करण्यात येणार आहे. टपाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वसामान्य जनतेला सेवा देणारी सर्व टपाल कार्यालये येत्या सहा महिन्यांत सक्षम करण्यात येणार असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.