ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू असतानाच माजिवडे मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत दर सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे वाहतुकीस अडथळा, महिलांची छेड काढणे, सोनसाखळी व पर्स चोरी असे प्रकार घडत होते. या आठवडी बाजारावर कारवाई करण्याबाबत कापुरबावडी पोलीस स्टेशन कार्यालयाने लेखी पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार सोमवारी (1 जून 2022) रोजी मानपाडा येथील आठवडी बाजारावर कारवाई करून या आठवडा बाजाराला प्रतिबंध करण्यात आला.
या कारवाईत मानपाडा ठामपा शाळा ते दुर्गा चौक दरम्यानच्या ३० हातगाडया, २० छत्र्या, रस्त्यालगत असणाऱ्या कोंबडी विक्रेत्यांचे दोन लोखंडी पिंजरे तसेच भाजीपाल्याचे रिकामे प्लॅस्टिक कॅरेट आदी सामान जप्त करण्यात आले. याच रस्त्याच्यालगत दुकानदारांनी दुकानासंलग्न केलेली १४ शेडची अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. रहिवाश्यांनी रस्त्यालगत ठेवलेल्या झाडाच्या कुंड्या उचलण्यात आल्या. या कारवाईमुळे ठामपा शाळा ते दुर्गा चौक मनोरमा नगर येथे नियोजित आठवडी बाजारावर प्रतिबंध आणण्यात आला.
सदरची कारवाई (उपआयुक्त परिमंडळ ३) दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांचे आदेशाने माजिवडे मानपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांनी ठेकेदाराची वाहने, मनुष्यबळ यांच्या सहाय्याने स्थानिक पोलीस स्टेशन व ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडील उपलब्ध पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.