पाणी खात्याचा ॲक्शन मोड; थकबाकीदारांच्या घशाला कोरड

ठाणेकरांनी १४१ कोटींची पाणी बिले थकवली

ठाणे : नेहमीप्रमाणे वागळे, दिवा आणि मुंब्रा पाणीपट्टी थकवण्यात आघाडीवर असून ठाणे महापालिका हद्दीत तब्बल १४१ कोटी ३५ लाखांची पाण्याची बिले नागरिकांनी थकवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या थकबाकीदारांवर आता फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तरीही कानाडोळा केल्यास ग्राहकांचे मिटर आणि पंप जप्त करण्यात येणार आहेत.

ठाणे महापालिका प्रशासनाने दिलेले उद्धीष्ट साध्य करण्यात पाणी पुरवठा विभागाला अपयश आले असून ठामपा क्षेत्रातील सर्व प्रभाग समित्यांमध्ये तब्बल १४१ कोटी ३५ लाख ११ हजार २५८ रुपये इतकी पाणीपट्टी थकली असून वसुली केवळ ३६ टक्केच झाली असल्याचे समोर आले आहे. या सुमार कामगिरीबद्दल अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी संताप व्यक्त करत आता थकबाकीदारांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी सर्व महापालिकांना २ मार्चपर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्या पार्श्वभुमीवर ठाणे महापालिकेचाही अर्थसंकल्प येत्या दोन दिवसांत सादर होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प सादर करताना आणि आर्थिक वर्ष संपण्याआधी प्रत्येक विभागाकडून उत्पन्नाचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत वसुलीबाबतची बैठक पार पडली असता इतर विभागांपेक्षा पाणी विभागाची कामगिरी अत्यंत्य सुमार असल्याचे निदर्शनास आले.

वास्तविक गेल्या अर्थसंकल्पात पाणीपट्टीपोटी २२२ कोटी ९७ लाख रुपये वसुलीचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र त्यापैकी केवळ ८१ कोटी दोन लाख रुपयेच वसुल करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

ठाणे शहराला पालिका ५८५ दशलक्ष लीटर पाणी पुरवते. त्यासाठी विविध प्राधिकरणाकडून पालिका पाणी विकत घेण्यासाठी वार्षिक सुमारे १४० कोटी रुपये खर्च करत आहे. तर इतर तांत्रिक कारणासाठी ११० कोटींचा खर्च होत आहे. हा खर्चही वसूल करण्यात अपयश येत असल्याचे यावेळी निदर्शनास आले आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी स्मार्ट मीटर बसवण्यात आले. मीटर बसवूनही जुन्या बीलाप्रमाणेच पाणीपट्टी वसुलीचे धोरण आखण्यात आले. पण तरीही वसुली ठप्प असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी कारवाईचे हत्यार उपसण्याच्या सुचना सर्व अधिकार्‍यांना दिले आहेत. जे थकबाकीदार कारवाई करताना थकबाकीची भरणा करणार नाहीत अशांवर त्वरितफौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत .

गुन्हे दाखल केल्यानंतरही जर थकबाकीसाठी प्रतिसाद मिळाला नाही तर अखेरचे पाऊल म्हणून मीटर व पंप जप्त करण्याचे आदेश आयुक्तांनी बैठकीत दिल्याचे समजते. ही कारवाई अधिक प्रभावी व्हावी यासाठी ३१ मार्चपर्यंत सर्व संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करून वसुल सुरूच ठेवण्याची तंबीही त्यांनी दिली आहे.

पाणीपट्टी थकवण्यात नेहमीप्रमाणे दिवा, मुंब्रा आणि वागळे प्रभाग समिती आघाडीवर असल्याचे निदर्शनास आले आहे. कळवा प्रभाग समितीमध्ये २२ कोटी ७८ लाख, ५४ हजार तर मुंब्य्रात सर्वाधिक २५ कोटी २१ लाख ६७ हजार इतकी थकबाकी आहे.

प्रभागनिहाय वसुली (टक्केवारीत)

दिवा २५.९२
कळवा ३१.२७
लोकमान्य नगर ४१.७०
मानपाडा ४१.१२
मुंब्रा ४१.२९
नौपाडा ३५.२२
उथळसर ४७.५१
वर्तकनगर ४८.६०
वागळे १८.६३