उल्हासनगर: उल्हासनगर मनपा प्रशासनाने शहरातील मुख्य बाजारपेठेत फटाका विक्री करणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.
नियम डावलून व्यवसाय करणाऱ्या चार दुकानदारांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई करीत त्यांच्याकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला असून, असा एकूण दोन लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे मुख्य बाजारपेठेत वर्षानुवर्षे मनमानीपणे व्यापार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या संदर्भात महापालिकेचे उपायुक्त (मुख्यालय) अशोक नाईकवाडे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, मार्केटमध्ये 36 फटाके दुकाने असून त्यापैकी 15 दुकानांची पडताळणी करण्यात आली आहे. यातील अनेक दुकानदारांनी नियमानुसार जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातून परवान्यांचे नूतनीकरण
केले नसल्याचे तपासात समोर आले आहे. उपायुक्त नाईकवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 पैकी 4 दुकानदारांच्या परवान्याची मुदत संपली असून, त्यांना परवाने वाढवून मिळालेले नाहीत. अशा चार दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दोन लाख रुपये वसूल करण्यात आले. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे नाईकवाडे यांचे म्हणणे आहे.
शहरातील सर्वात वर्दळीच्या बाजारपेठांच्या यादीत नेहरू चौक परिसर आणि येथील बाजारपेठेचेही नाव आहे. नेहरू चौकाव्यतिरिक्त अमन टॉकीज रोड, गोल मैदान रोड आणि काँग्रेस कार्यालयाजवळ फटाक्यांची मोठी दुकाने आहेत. त्यांच्याकडे परवाना आहे, मात्र वर्दळीच्या ठिकाणी लोकांची गर्दी असताना फटाके विक्रीची परवानगी कशी मिळते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.